Bhargav Jagtap Shares Experience Of Meeting Shah Rukh Khan : आपल्या आवडत्या कलाकाराकडून आपलं कौतुक होणं ही प्रत्येक अभिनेता किंवा अभिनेत्रीला त्याच्या आयुष्यात हवीहवीशी वाटणारी गोष्ट असते. त्यात जर तो कलाकार किंग खान म्हणजेच शाहरुख खान असेल तर नशीबच उजळलं. मनोरंजन क्षेत्रातल्या अनेक कलाकारांना शाहरुख खानला भेटण्याची इच्छा आहे. अशीच इच्छा एका बालकलाकाराची झाली आणि हा कलाकार म्हणजे भार्गव जगताप
भार्गव जगताप हे नाव आता सर्वांच्याच ओळखीचं झालं, याचं कारण म्हणजे भार्गवला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. भार्गवला ‘नाळ २’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून ७१व्या राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानीत करण्यात आलं. याबद्दल त्याचं सर्व स्तरातून कौतुक होत असतानाच स्वत: शाहरुख खाननेसुद्धा भार्गवला कौतुकाची थाप दिली.
शाहरुखने भार्गवचं कौतुक केल्याचे अनेक फोटो-व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमधून शाहरुख खानचा प्रेमळ स्वभाव पाहायला मिळाला. याच खास क्षणाबद्दल आता स्वत: भार्गवने आपली भावना व्यक्त केली आहे. भार्गवने नुकताच ‘नवशक्ती’शी संवाद साधला, यावेळी त्याने शाहरुख खानच्या भेटीचा, तसंच राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतरच्या आनंदी भावना व्यक्त केल्या आहेत.
शाहरुख खानच्या भेटीबद्दल भार्गव म्हणतो, “माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट होती. मी त्यांना शाहरुख खान सर अशी हाक मारली. त्यानंतर ते आले, हात मिळवला आणि माझ्या पाठीवरहात ठेवत कौतुक केलं. त्यानंतर मी त्यांच्या पाया पडलो. तो क्षण माझ्यासाठी खूपच खास होता. सगळं काही स्तब्ध झाल्यासारखं वाटलं. मला काय करू आणि काय नको असं झालं होतं.”
यानंतर भार्गवने त्याच्या राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारतानाच्या भावना व्यक्त केल्या. याबद्दल भार्गव म्हणाला, “‘नाळ २’ हा माझा पहिला सिनेमा आणि पहिल्या सिनेमासाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यामुळे खूपच आनंद झाला. माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे.”
भार्गव जगताप इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, शाहरुख आणि भार्गव यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये शाहरुख खान अवॉर्ड घेऊन आपल्या जागेवर परतत येत असताना भार्गवने त्याचं अभिनंदन केलं. नंतर शाहरुखनेदेखील त्याच्याशी हात मिळवला आणि दोघांनी हँडशेक केला. पुढे भार्गव शाहरुख खानच्या पाया पडला आणि शाहरुखनेही त्याला मुलाप्रमाणे जवळ घेत मिठी मारली आणि त्याचंही कौतुक केलं.
दरम्यान, भार्गवबद्दल सांगायचं झाल्यास, भार्गवने ‘नाळ २’ या सिनेमात उत्तम काम केलं आहे. या सिनेमातील भुमिकेसाठी त्याला यंदाचा राज्य मराठी चित्रपट पुरस्कारदेखील मिळाला आहे. ‘नाळ’ सिनेमातील तिन्ही बालकलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. भार्गवसह त्रिशा ठोसर आणि श्रीनिवास पोकळे यांनीही राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली.