Bhushan Pradhan : ‘घरत गणपती’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘जुनं फर्निचर’ या चित्रपटांमुळे अभिनेता भूषण प्रधान घराघरांत लोकप्रिय झाला. मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हणून भूषणला ओळखलं जातं. त्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. भूषण सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो. त्याचा फिटनेस मंत्रा, फोटोशूट, नवनवीन प्रोजेक्ट्सबाबतच्या अपडेट्स भूषण नेहमी इन्स्टाग्रामवर शेअर करत असतो. मात्र, त्याने नुकताच शेअर केलेला एक फोटो सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.
भूषण प्रधानचं अद्याप लग्न झालेलं नाही. अनेकदा चाहते त्याला लग्न केव्हा करणार, तुझी गर्लफ्रेंड कोण आहे असे प्रश्न विचारत असतात. मात्र, भूषणने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोमुळे त्याच्या तमाम चाहत्यांना धक्का बसला आहे. याशिवाय या पोस्टचं कॅप्शन वाचून चाहत्यांमध्ये संभ्रम सुद्धा निर्माण झाला आहे.
भूषण प्रधानने अभिनेत्री केतकीसह फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून दोघांनी सोशल मीडियावर खरंच गुडन्यूज शेअर केलीये का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कारण, या पोस्टच्या कॅप्शनमध्ये भूषण लिहितो, “खूप दिवस आम्ही एक गुपित दडवून ठेवलंय” कॅप्शन आणि फोटो पाहून नेटकऱ्यांनी यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
“ओह माय-माय लग्न कधी झालं?”, “४ वर्षे मी तुला फॉलो करतेय तुझं लग्न केव्हा झालं… भूषण मी काही पोस्ट खरंच मिस केल्या का?”, “काहीतरी गोलमाल आहे नेमकं काय आहे?”, “ही गरोदर आहे का?”, “नेमकं सिक्रेट काय आहे?”, “फोटो बघून नक्की काय ठरवायचं लग्न झालं आहे की बाळ होणार आहे?” अशा असंख्य कमेंट्स या पोस्टवर आल्या आहेत.
याउलट अभिनेत्याच्या काही चाहत्यांनी भूषणचा लवकरच नवीन प्रोजेक्ट येत असणार त्यामुळे ही फक्त प्रमोशनल पोस्ट आहे अशा कमेंट्सही केल्या आहेत. “हे फक्त प्रमोशन आहे”, “भूषण नवीन मालिका येतेय की चित्रपट येतोय नक्की सांग”, “तुला नव्या प्रोजेक्टसाठी शुभेच्छा” अशाप्रकारे काही नेटकऱ्यांनी हा सगळा प्रमोशनचा भाग असल्याचंही कमेंट्समध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, आता या फोटोमागचा नेमका उद्देश काय? ही वैयक्तिक पोस्ट आहे की प्रमोशनल? याचा खुलासा लवकरच भूषणकडून केला जाईल.