Bushan Pradhan Talks About Tu Maza Kinara Film : भूषण प्रधान मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. आजवर त्याने अनेक चित्रपटांत विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या तो त्याच्या ‘तू माझा किनारा’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. यानिमित्त भूषण यात एका मुलीच्या वडिलांची भूमिका साकारण्याबद्दल बोलला आहे.
भूषण प्रधान लवकरच ‘तू माझा किनारा’ या चित्रपटातून झळकणार आहे. यामध्ये त्याच्यासह अभिनेत्री केतकी नारायण व बालकलाकार केया इंगळे झळकणार आहे. येत्या ३१ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अशातच यानिमित्त भूषणने ‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत चित्रपटात वडिलांची भूमिका साकारण्याचा अनुभव सांगितला आहे.
तू माझा किनारामधील भूमिकेबद्दल भूषणची प्रतिक्रिया
मुलाखतीत भूषणला चित्रपटाबद्दल विचारल्यानंतर तो म्हणाला, “मला या कुटुंबाची गोष्ट खूप भावली. याआधी मी कधीच वडिलांची भूमिका साकारली नव्हती आणि हे जे नातं चित्रपटात ज्या पद्धतीने उलगडत जात आहे, हे असं मी कधीच चित्रपटात अनुभवलं नव्हतं. काही गोष्टी ज्या आपल्या आयुष्यात घडलेल्या नसतात, आपल्याला त्या या मार्फत अनुभवता येतात.”
भूषण पुढे म्हणाला, “मी खऱ्या आयुष्यात अजून वडील झालेलो नाहीये, पण असं असतानाही ही भूमिका साकारताना तो अनुभव मला घेता आला. मला भाचा, भाची, पुतणे, पुतणी आहेत; त्यामुळे मी खूप कडक शिस्तीचा काका, मामा आहे. त्यातून पालकत्वाचा थोडासा अनुभव येतो, पण तरीही वडिलांची भूमिका खऱ्या आयुष्यात अनुभवली नव्हती आणि तीच यातून अनुभवता येतेय.”
भूषण पुढे त्याने काम केलेल्या चित्रपटांबद्दल म्हणाला, “मी आजवर अनेक नवीन दिग्दर्शकांबरोबर काम केलं आहे. चित्रपट का करायचा याबद्दलची स्पष्टता असल्यामुळे मला कधीच मी केलेल्या चित्रपटाची लाज वाटली नाही. प्रत्येक चित्रपटात चुका असतात तशा आमच्याही आहेतच, त्यातून आम्ही शिकत असतो.”
दरम्यान, भूषण प्रधान मराठी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेता आहे. भूषण अनेकदा विविध भूमिकांमधून समोर येत असतो. त्याने आजवर अनेक लोकप्रिय कलाकारांबरोबर काम केलं आहे. भूषणचं खऱ्या आयुष्यात अजून लग्न झालेलं नाहीये, त्यामुळे लग्नाआधीच खऱ्या आयुष्यात वडील न होता त्याने चित्रपटामार्फत वडील होण्याचा अनुभव घेतल्याचं म्हटलं आहे. आता लवकरच तो या आगामी चित्रपटातून एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
