Nawazuddin Siddiqui Praises Marathi Movies :काही महिन्यांपासून मराठी सिनेमे चांगली कामगिरी करीत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ‘एप्रिल मे ९९’, ‘गुलकंद’, ‘जारण’, ‘आता थांबायचं नाय’ या सिनेमांना चांगलंच यश मिळालं आहे. बॉक्स ऑफिसवरील कलेक्शनसह समीक्षकांकडूनही हे सिनेमे नावाजले गेले. त्यामुळे मराठी सिनेमे पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करीत आहेत आणि त्याबद्दल अनेक जण मराठी सिनेमांचं कौतुकही करीत आहेत.
मराठी सिनेमांना मिळणाऱ्या या यशाबद्दल मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी या कलाकृतींचं कौतुक केलं आहे. अशातच आता बॉलीवूडच्या कलाकारांनीसुद्धा मराठी सिनेमा आणि कलाकारांची पाठ थोपटली आहे. नुकताच मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याला नवाजुद्दीन सिद्दीकी, जयदीप अहलावत, राजकुमार राव, तब्बू अशा काही बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती.
यावेळी Telly Talk India या यूट्यूब वाहिनीशी साधलेल्या संवादात नवाजुद्दीन सिद्दीकीने मराठी सिनेमा आणि मराठी कलाकारांचं कौतुक केलं. याबद्दल नवाजुद्दीन म्हणाला, “मराठीत नेहमीच चांगले सिनेमे बनत आले आहेत. मी तर म्हणतो की, बॉलीवूडपेक्षा चांगले सिनेमे मराठी इंडस्ट्रीत बनत आहेत. ‘फँड्री’, ‘कोर्ट’ यांसारखे अनेक उत्तम चित्रपट मराठी सिनेसृष्टीत आले आहेत. त्याचं कारण हे आहे की, मराठीतल्या सगळ्या कलाकारांना नाटकाची पार्श्वभूमी आहे.”
त्यानंतर तो असं म्हणतो, “मराठीमधील सगळेच कलाकार नाटकातून येत असल्यामुळे ते अभिनयाचा खूप सराव आणि तालमी करतात. अभिनयाची उत्तम जाण आणि उत्तम क्षमता असलेले अनेक कलाकार मराठी इंडस्ट्रीत आहेत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की, त्यांना जे स्थान मिळायला हवं, ते अजून मिळालेलं नाही.”
नवाजुद्दीन सिद्दीकी इन्स्टाग्राम पोस्ट
त्यानंतर नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतो, “मला असं वाटतं की, या सगळ्या उत्तम कलाकारांना घेऊन एखादा बिग बजेट चित्रपट बनवला जाईल किंवा या कलाकारांना जेव्हा स्टार बनवलं जाईल. तेव्हा आणखी सकारात्मक बदल होऊ शकतो.” त्यानंतर त्यानं त्याच्या आवडत्या मराठी चित्रपटांविषयी असं म्हटलं, “मराठीत दरवर्षी अनेक चित्रपट येत असतात आणि हे सगळेच चित्रपट चांगले असतात.”
दरम्यान, नुकत्याच झालेल्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात प्राजक्ता माळीचा ‘फुलवंती’ हा सात प्रमुख पुरस्कारांसह सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला. तर ‘पाणी’ या चित्रपटानं सहा पुरस्कार पटकावले. महेश मांजरेकर यांना ‘जुनं फर्निचर’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. आदिनाथ कोठारेला ‘पाणी’साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारानं गौरवण्यात आलं. तर, जितेंद्र जोशीला ‘घात’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटिक्स चॉइस) पुरस्कार मिळाला.
या पुरस्कार सोहळ्यात उषा मंगेशकर यांना मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय आणि महत्त्वपूर्ण योगदानासाठी प्रतिष्ठित जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्याशिवाय सोहळ्यात संजू राठोडच्या ‘शेकी’, तसेच डीजे क्रेटेक्स आणि श्रेयस यांच्या ‘तांबडी चांबडी’ हा हिट गाण्यांनी आणखीनच रंगत आणली.