Chhaya Kadam Visits Her Village In Kokan : रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून ब्रेक घेत अनेक कलाकार मंडळी ही विविध ठिकाणी फिरायला जात असतात. अनेक कलाकार हे सहसा परदेशात त्यांच्या सुट्ट्या एन्जॉय करायला जात असतात. मात्र काही कलाकार मंडळींना त्यांच्या गावी सुट्ट्यांच्या आनंद घेणं अधिक आवडतं. त्यामुळे वेळ मिळाला की, ही कलाकार मंडळी थेट आपलं गाव गाठतात. अशीच दोन दिवसाची सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मराठी अभिनेत्री गावी पोहोचली आहे.

मराठीसह हिंदी सिनेविश्वात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या छाया कदम यांनी कामाच्या व्यग्रतेतून वेळ काढत आपलं गाव गाठलं. कोकणातील धामापुर हे छाया कदम यांचं मुळ गाव असून अनेकदा त्या आपल्या गावी भेटी देत असतात आणि सोशल मीडियाद्वारे या भेटीचे काही खास क्षण ते चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. अशातच त्यांनी नुकतंच गावच्या भेटीचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत.

छाया कदम या सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या त्यांच्या विविध लूक्समधील फोटो शेअर करत असतात. तसंच कामानिमित्तची माहितीसुद्धा ते शेअर करत असतात. अशातच त्यांनी व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढला आणि कोकणातील गावाला भेट दिली. याचे काही व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या व्हिडीओमधील त्यांचा साधेपणा अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.

छाया कदम यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील पहिल्या व्हिडीओमध्ये त्या घराच्या उंबरठ्यावर बसून बाहेरच्या निसर्गाचा आनंद घेत आहेत. दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांची वाहिनी दारात रांगोळी काढत असल्याचं पाहायला मिळत आहे. यानंतर तिसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी गावच्या मंदिराची झलक दाखवली आहे.

यानंतर छाया कदम यांनी त्यांच्या घरी नागपंचमीनिमित्त बनलेल्या कोकणातील पारंपरिक पदार्थ शिरवाळ्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच या व्हिडीओमध्ये छाया कदम यांनी त्यांच्या कुटुंबियांची सुद्धा ओळख करून दिली आहे. त्यानंतरच्या व्हिडीओमध्ये त्या ‘मन तळ्यात मळ्यात’ हे गीत गात आहेत. तर पुढे त्या कोकणातील गावच्या निसर्गसौंदर्याचा अनुभव घेतानाचे पाहायला मिळत आहे.

छाया कदम इन्स्टाग्राम पोस्ट

या व्हिडीओमध्ये त्या कोकणात आता गणपती येतील आणि त्याचे वेध लागल्याचेही म्हणत आहेत. कोकणात गणपती येणार, त्यानिमित्ताने नैवेद्य, पारंपरिक खेळ अशी सगळी धमाल असणार असंही त्या म्हणतात. एकूणच छाया कदम यांनी त्यांच्या या सर्व व्हिडीओंमधून चाहत्यांना कोकणाची सफर घडवून आणली आहे. त्यांचे हे व्हिडीओ पाहून अनेकांनी त्यांच्या साधेपणाचं कौतुकही केलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गावांक दोन दिवसाची धावती भेट असं म्हणत छाया कदम यांनी हे खास क्षण शेअर केले आहेत. दरम्यान त्यांनी शेअर शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी “कोकण म्हणजे स्वर्ग”, “गावाक सगळा मस्त वाटता. बाकी स्वर्गसुखच त्या”, “खूप छान”, तुमच्यामुळे आम्हालाही कोकणचं दर्शन घडलं” या आणि अशा अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्याचबरोबर छाया कदम यांच्या साधेपणाचंही अनेकांनी कौतुक केलं आहे.