मराठी कलाविश्वाची ‘फुलवंती’ म्हणून प्राजक्ता माळीला घराघरांत ओळखलं जातं. तिचा दमदार अभिनय, निखळ हास्य, हास्यजत्रेतील निवेदनाची अनोखी शैली या सगळ्याचं सोशल मीडियावर तसेच प्राजक्ताच्या सहकलाकारांकडून कायमच कौतुक केलं जातं. याशिवाय यंदाच्या वर्षी प्राजक्ताला ‘फुलवंती’ सिनेमातील अभिनयासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. अशाच एका पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्राजक्ताचं कौतुक करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

‘फुलवंती’ सिनेमाच्या निमित्ताने प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं. यासह सिनेमात तिने मुख्य भूमिका सुद्धा साकारली आहे. यासाठी प्राजक्ताला यंदा ‘झी २४ तास’च्या ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर, प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांना ‘आता थांबायचं नाय’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सोहळ्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते. त्यांनी भरत जाधव आणि प्राजक्ता माळी या दोघांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री उपस्थित असलेल्या सगळ्याच मराठी कलाकारांना प्रोत्साहन देत त्यांचं कौतुक करत होते. यावेळी भरत जाधव यांच्या ‘सही रे सही’ या नाटकाचा विशेष उल्लेख त्यांनी केला. भरत जाधव यांनी नेहमीच विविध माध्यमांतून मराठी रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं असं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस पुढे म्हणतात, “इथे प्राजक्ता माळी सुद्धा उपस्थित आहेत. खरंतर, मगाशी मी आलो तेव्हा मला माहिती नव्हतं की, प्राजक्ता सुद्धा इथे आल्या आहेत. पण, नंतर मला आवाज आला ‘वाह दादा वाह…’ तेव्हा माझ्या लक्षात आलं की, प्राजक्ताशिवाय दुसरं कोणी असू शकत नाही. त्यामुळे त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो.”

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात स्किट सुरू असताना प्राजक्ता अनेकदा ‘वाद दादा वाह’ हा डायलॉग बोलून कलाकारांना दाद देत असते. हा डायलॉग आणि या संदर्भातील रील्स व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. त्यामुळे ‘वाद दादा वाह’ ही प्राजक्ताची नवीन ओळख झालीये. आपला हा डायलॉग मुख्यमंत्र्यांना सुद्धा माहिती आहे याची कल्पना अभिनेत्रीला नव्हती. म्हणूनच मुख्यमंत्र्यांचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. “वाह दादा वाह हा संवाद इतका लोकप्रिय झालाय याची खरंच कल्पना नव्हती. कृतज्ञ” असं अभिनेत्रीने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, ‘फुलवंती’ सिनेमासाठी प्राजक्ता माळीला यंदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय ‘झी चित्र गौरव’ पुरस्कार सोहळ्यात सुद्धा प्राजक्ता विजयी ठरली होती.