Marathi Singer Express Displeasure on 3 Movies Released on Same Day : १२ सप्टेंबर या दिवशी ‘दशावतार’, ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ असे तीन वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रदर्शित झाले. एकाच दिवशी तीन तीन सिनेमे प्रदर्शित झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. सध्या तरी तिकीटबारीवरील कमाईचे आकडे पाहता ‘दशावतार’ या सिनेमाने ‘आरपार’ आणि ‘बिन लग्नाची गोष्ट’ या सिनेमांना काहीसं मागे टाकलं आहे.
‘बिन लग्नाची गोष्ट’ आणि ‘आरपार’ हे सिनेमे कोणत्या तरी वेगळ्या तारखेला प्रदर्शित झाले असते तर कदाचित या सिनेमांच्या आकड्यांमध्ये आणखी बदल पाहायला मिळाला असता. तीनही चित्रपटांचे विषय भिन्न असल्याने प्रेक्षकांसमोर कोणता चित्रपट पाहायचा, हा प्रश्न निर्माण झाला आणि हाच प्रश्न एका मराठी गायकानेसुद्धा उपस्थित केला आहे.
मराठी गायक मंगेश बोरगांवकर हा आपल्या गायनाबरोबरच सोशल मीडियावरही तितकाच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याची मतं व्यक्त करताना दिसतो. अशातच त्याने एकाच दिवशी तीन-तीन मराठी सिनेमे प्रदर्शित झाल्याबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. प्रदर्शनाआधी निर्मात्यांनी समन्वय ठेवत वेगवेगळ्या तारखांना हे सिनेमे प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला पाहिजे होता असं मतही त्याने व्यक्त केलं आहे.
मंगेशने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मंगेश म्हणतो, “नुकताच ‘आरपार’ हा चित्रपट पाहिला आणि तो बघत असतानाच जाणवलं की, एकाच आठवड्यात तीन-चार मराठी सिनेमे प्रदर्शित झाले आहेत. आधीच मराठी सिनेमांची एवढी वाईट अवस्था आहे.”
यापुढे मंगेश म्हणतो, “इंडस्ट्रीमधील लोकांचा एकमेकांशी समन्वय नाही. असे एकत्र चित्रपट आल्यास कुणालाच नीट वेळ मिळणार नाही, कारण आपल्याकडे बॉलीवूड आणि बाकी इंडस्ट्रीचे सिनेमेसुद्धा पाहिले जातात. अशावेळी तुम्ही एकाच दिवशी असे पाच-सहा मराठी सिनेमे प्रदर्शित करता… मग हे सिनेमे लोक कसे पाहणार? आपल्याकडे इतकी क्षमता नाहीय. प्रेक्षक सगळेच चित्रपट बघतील असं नाहीय.”
मंगेश बोरगांवकर इन्स्टाग्राम व्हिडीओ
यापुढे मंगेशने म्हटलंय, “इंडस्ट्रीतील लोकांनी जर एकमेकांमध्ये थोडा समन्वय साधला, तर सगळ्यांनाच संधी मिळेल. पण, तसं करायचं नसेल, कारण ही गोष्ट सामान्य प्रेक्षकांना लक्षात येते, पण इंडस्ट्रीतील कोणाला कळत नाहीये.” पुढे मंगेशने सर्वांना, तुम्हाला काय वाटतं? असा प्रश्नही विचारला आहे.
Sacnilk वरील माहितीनुसार, ‘दशावतार’ सिनेमाने आतापर्यंत १६.६५ कोटींची कमाई केली आहे, तर ‘आरपार’ने १.१७ कोटी कमावले आहेत. ‘बिन लग्नाची गोष्ट’ या सिनेमाची आतापर्यंतची कमाई १.१ कोटी इतकी आहे. एकाच दिवशी हे तिन्ही सिनेमे प्रदर्शित झाल्याने त्याचा परिणाम तिकीटबारीवर झाला आहे.