Dashavatar Marathi Movie : घनदाट जंगल, कातळशिल्प, दमदार कलाकार, खाणकाम आणि मनाला भावणारं पार्श्वसंगीत कानावर पडत ‘दशावतार’ सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांसमोर आला. देवभूमी मानल्या जाणाऱ्या कोकणातील राखणदाराच्या भोवती या सिनेमाची संपूर्ण कथा फिरणार आहे. आता प्रत्यक्ष राखणदार कोण? त्याची ओळख प्रेक्षकांना सिनेमागृहातच होईलच पण, तत्पूर्वी या टीमने ‘दशावतार’ चित्रपटाबद्दलचे अनोखे किस्से ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी संवाद साधताना सांगितले आहेत.

कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचा अवतार या ‘दशावतार’ सिनेमाच्या निमित्ताने प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर या सिनेमात बाबुली मिस्त्रीची भूमिका साकारताना दिसतील. कोकणात जवळपास दोन महिने या सिनेमाचं शूटिंग सुरू होतं. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच अप्रतिम सिनेमॅटोग्राफीची जादू सिनेप्रेमींना अनुभवायला मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांत मराठी सिनेमांना प्रतिसाद मिळत नाहीये असा नाराजीचा सूर सर्वत्र उमटला होता. यावर अनेकांनी मराठी सिनेमा अन्य भाषांमध्ये डब व्हायला पाहिजे, आपल्या मातीशी नाळ जोडलेला सिनेमा ग्लोबली पोहोचला पाहिजे असा प्रस्ताव ठेवला होता. ‘दशावतार’ सिनेमा सुद्धा कोकणातील संस्कृतीशी जोडला गेला आहे. यामध्ये प्रेक्षकांना मराठी आणि काही अंशी मालवणी भाषा ऐकायला मिळेल. त्यामुळे जर हा सिनेमा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर काहीतरी हटके आणि अनोखं करावं लागेल याची जाणीव टीमलाही होती. यामुळेच ‘दशावतार’मध्ये चित्रभाषेवर जास्त भर देण्यात आला. काही भावना शब्दांतून व्यक्त नाही झाल्या तरी, त्या चित्रातून सहज व्यक्त करता येतात. यालाच अनुसरून हा सिनेमा प्रदर्शनाआधी सबटायटलशिवाय काही अन्य भाषिक प्रेक्षकांना दाखवण्याचा निर्णय दिग्दर्शक-निर्मात्यांनी घेतला होता आणि हा प्रयोग यशस्वी झाला.

“दशावतार हा कोकणातल्या एका संस्कृतीसंदर्भातला चित्रपट आहे. तो मालवणी-मराठी भाषेत आहे. पण तो तेवढ्यापुरता मर्यादित राहू नये असं आम्हाला मनापासून वाटलं. म्हणून आम्ही हा चित्रपट गुजराती भाषिक पाच मित्रांना दाखवला. त्यांना सबटायटल्स दाखवण्यात आले नाहीत. तरीही त्यांना चित्रपट कळला. आम्हाला जे म्हणायचंय ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं. चित्रपटाची भाषा अमुक म्हणून संकुचित होण्यापेक्षा चित्रभाषा असावी असा आमचा प्रयत्न होता. चित्रपट लोकल म्हणजे स्थानिक असला तरी त्याचं म्हणणं ग्लोबल आहे. म्हणूनच हा चित्रपट फक्त मराठी माणसांनी पाहावा असं आम्हाला वाटत नाही. उलट तो अधिकाअधिक बिगरमराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा असाही आमचा प्रयत्न आहे.” अशी माहिती निर्माते आदित्य जोशी व दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी लोकसत्ताला दिली.

‘दशावतार’ हा चित्रपट महाराष्ट्रापलीकडे जागतिक स्तरावरही गाजू लागला आहे. न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरवर ‘दशावतार’ची झलक परदेशातील नागरिकांना नुकतीच पाहायला मिळाली. हा सिनेमा महाराष्ट्रासह देशातील प्रमुख शहरांमध्ये आणि परदेशातही १२ सप्टेंबरलाच प्रदर्शित होणार आहे.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर या कलाकारांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.