गश्मीर महाजनी(Gashmeer Mahajani)‘फुलवंती’ चित्रपटातून नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. याबरोबरच लोकप्रिय टीव्ही शो ‘खतरों के खिलाडी’मधून तसेच ‘फुलवंती’मधील त्याच्या भूमिकेतून अभिनेत्याने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. लवकरच तो एक राधा एक मीरा चित्रपटातून एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता एका मुलाखतीत लहानपणापासून महिलांचे जास्त संस्कार झाल्यामुळे त्यांना चांगल्या प्रकारे समजून घेता येते, असे म्हटले.

गश्मीर महाजनी काय म्हणाले?

गश्मीर महाजनीने ‘लोकशाही फ्रेंडली’ला नुकतीच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत महिला चाहत्यांबद्दल बोलताना त्याने म्हटले, “आता माझा जो चित्रपट येणार आहे, त्या निमित्ताने मी गावोगावी, शहराशहरांत फिरतोय. महिलांचा मला एक वेगळाच प्रतिसाद मिळतोय. मला वाटतं की, महिलांबरोबर मी जास्त कनेक्ट करू शकतो. मी बायकांमध्ये वाढलेला माणूस आहे. बाबा आणि आम्ही वेगळे झाल्यामुळे लहानपणापासून माझ्यावर महिलांचे जास्त संस्कार झाले. माझा वावर जास्त महिलांमध्ये असल्याने मी नैसर्गिकपणे त्यांच्याशी वेगळ्या पद्धतीने कनेक्ट होतो. माझ्या निर्मात्या जर महिला असतील, तर आमचं खूप चांगलं जमतं. मी जिथे काम करतो, तिथल्या नायिकांबरोबर माझं चांगलं जमतं. मॅनेजमेंटमध्ये जर महिला असतील, तर माझं काम लवकर होतं. हे आकर्षणामुळे वगैरे नाही. तेसुद्धा असेल; पण ते खूप दुय्यम आहे. माझी महिलांबरोबर वेव्हलेंथ चांगली जमते. कारण- मी महिलांमध्ये वाढलो आहे. मला वाटतं की, मी महिलांना खूप छान समजू शकतो आणि महिलादेखील मला खूप चांगलं समजू शकतात. कारण- मी कनेक्टसुद्धा राहतो. आई-बहिणीनं वाढवलं आहे. पुण्यामध्ये आमच्या हॉस्टेल होतं. ज्या रूम रिकाम्या होत्या, तिथे मुलींना पेईंग गेस्ट म्हणून ठेवायचे. तिथे कायम १५- १६ मुलींचा वावर असायचा, जिथे मी वाढलो आहे, लहानाचा मोठा झालो आहे. मला बायका कळतात थोड्याफार प्रमाणात आणि मला आवडतातसुद्धा. कारण- बायका पुरुषांपेक्षा प्रत्येक गोष्टीत जास्त काटेकोर असतात. एखादं काम योग्य वेळी होणं, यामध्ये बायकांचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे मी पुरुषांना कमी लेखतोय, असं मुळीच नाही.

पुढे बोलताना गश्मीरने म्हटले की जेव्हा महिला चाहत्यांना भेटतो. तेव्हा जाणवते की महिलांना ती वेव्हलेंथ कनेक्ट होते. स्त्री १५ ते २५ मधली असेल, तर तिला बॉयफ्रेंड दिसतो. २५ ते ४० मधली असेल, तर त्याच्यात तिला नवरा दिसतो. ४० ते ५५ पर्यंत असेल, तर तिला त्याच्यात मुलगा दिसतो. कित्येक आजींना नातू दिसतो. ही एक वेगळी नाळ जोडली गेलेली आहे. ते एक वेगळं नातं जोडलं जातं. या शब्दांत आपल्या भावना गश्मीरने व्यक्त केल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.