Gashmeer Mahajani on Dashavtar Movie: सध्या अनेक मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या चित्रपटांमध्ये ‘बिन लग्नाची गोष्ट’, ‘आरपार’ आणि ‘दशावतार’ या चित्रपटांचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे तीन चित्रपट १२ सप्टेंबरला प्रदर्शित झाले आहेत.
‘बिन लग्नाची गोष्ट’ या चित्रपटात प्रिया बापट, उमेश कामत, निवेदिता सराफ, गिरीश ओक हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. ‘आरपार’ या चित्रपटात ललित प्रभाकर व हृता दुर्गुळे हे प्रमुख भूमिकेत आहेत. तर ‘दशावतार’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर हे प्रमुख भूमिकेत दिसत आहेत.
‘दशावतार’ या चित्रपटाविषयी बोलायचे तर कोकणातील पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा आधारित आहे. दशावतार ही प्रामुख्याने कोकणात सादर केली जाणारी नाट्यकला आहे. या चित्रपटात कोकणातील विविध गोष्टी पाहायला मिळतात. दिलीप प्रभावळकर यांनी या चित्रपटात बाबुली मेस्त्री ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.
“आज चित्रपटगृहात…”
चित्रपट प्रदर्शित होण्याआधीपासूनच या सिनेमाची मोठी चर्चा सुरू होती. दिलीप प्रभावळकर यांच्या लूकने लक्ष वेधले होते. आता चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही कलाकारांच्या अभिनयापासून ते कथेच्या मांडणीपर्यंत चर्चा सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये प्रेक्षकांनी चित्रपट पाहतानाचे अनुभव सांगितले आहेत. काहींनी हा सिनेमा भावुक करणारा असल्याचे म्हटले आहे. तीन दिवसांत या चित्रपटाने ४ कोटींहून अधिक कमाई केली आहे. इतकेच काय तर प्रदर्शित झाल्याच्या पहिल्याच दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा २०२५ मधील पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.
आता अभिनेता गश्मीर महाजनीने दशावतार चित्रपट पाहिल्यानंतर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्याने सोशल मीडियावर दशावतारचे एक पोस्टर शेअर करत लिहिले, “आज चित्रपटगृहात जाऊन एक चांगला चित्रपट पाहिला”, असे कॅप्शन दिले आहे. तसेच पुढे हार्ट इमोजी देखील शेअर केली आहे.

गश्मीर महाजनी हा सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. तो आता पुन्हा कोणत्या भूमिकेतून आणि कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. चाहते गश्मीरला याबाबत वेळोवेळी विचारताना दिसतात.
दरम्यान, आगामी काळात दशावतार चित्रपट किती कमाई करणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.