Gashmeer Mahajani on Mumbaicha Faujdar remake: मराठी चित्रपटविश्वातील काही चित्रपट असे आहेत, ज्यांचा प्रभाव वर्षानुवर्षे प्रेक्षकांवर राहतो. चित्रपटाची कथा, कलाकारांचा अभिनय व गाणी यांमुळे काही चित्रपटांचा चाहतावर्ग कायम असतो.
रवींद्र महाजनी व रंजना देशमुख यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘मुंबईचा फौजदार’ हा चित्रपट त्यापैकीच एक आहे. १९८४ साली प्रदर्शित झालेला या चित्रपटाबद्दल आजही बोलले जाते. तसेच, या चित्रपटाचा रिमेक कधी येणार, असाही प्रश्न रवींद्र महाजनींचा मुलगा गश्मीर महाजनीला अनेकदा विचारला जातो.
गश्मीर महाजनीने काही मुलाखतींमध्ये ‘मुंबईचा फौजदार’चा रिमेक करणार असल्याचे वक्तव्य याआधी आहे. आता तो पुन्हा एकदा या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे.
गश्मीर महाजनी काय म्हणाला?
सोशल मीडियावर नुकताच त्याने चाहत्यांना त्यांचे प्रश्न विचारण्यास सांगितले होते. ‘आस्क मी क्वेश्चन’ या सत्रामध्ये गश्मीर महाजनीला चाहत्यांनी अनेक प्रश्न विचारले. त्यामध्ये एक प्रश्न असाही होता की, तू मुंबईचा फौजदार चित्रपटाचा रिमेक बनवशील का? आणि त्यामध्ये प्रमुख भूमिकांमध्ये तू आणि अभिनेत्री प्राजक्ता माळी असणार का? कारण- तुम्ही दोघे एकत्र ऑनक्रीन छान दिसला होता. जोडी खूप छान दिसते.

गश्मीर महाजनीनेदेखील या प्रश्नाचे उत्तर दिले. अभिनेता म्हणाला, “मी तर रिमेक बनवणारच आहे. पण, प्राजक्ता चित्रपटात काम करेल की नाही, मला माहीत नाही.”
त्याबरोबरच आम्हाला तुझी आठवण येते, तुला पुन्हा कधी स्क्रीनवर पाहायला मिळेल? असेही अभिनेत्याला विचारले. त्यावर गश्मीर म्हणाला, “थोडा संयम ठेवा. चांगल्या कामासाठी वेळ लागतो.” तू उत्तम मराठी अभिनेता आहेस. पुढचा चित्रपट कधी प्रदर्शित होणार आहे?”, त्यावर अभिनेत्याने पुढच्या वर्षी असे उत्तर दिले.
तर अभिनेत्याचा आवडता चित्रपट कोणता, आवडते गाणे कोणते, त्याने नुकताच कोणता चित्रपट पाहिला, असे अनेक प्रश्न त्याला विचारले, गश्मीरनेदेखील त्या प्रश्नांची उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले.
गश्मीर महाजनी व प्राजक्ता माळी यांनी २०२४ साली प्रदर्शित झालेल्या फुलवंती या चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांना, ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटाची निर्मिती प्राजक्ता माळीने केली होती. आता आगामी काळात ते कोणत्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, ‘फुलवंती’नंतर पुन्हा ते एकत्र दिसणार का, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडल्याचे वेळोवेळी दिसते. त्यांना पुन्हा एकत्र पाहण्यास चाहते उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.
गश्मीर महाजनीने ‘देऊळ बंद’ या चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘गुनाह’सारख्या वेब सीरिजमध्येदेखील काम केले आहे. तसेच इमली ही त्याची हिंदी मालिकादेखील मोठ्या प्रमाणात गाजली. ‘खतरों के खिलाडी’मध्ये सहभागी होत गश्मीरने सर्वांची मने जिंकली. आता अभिनेता कोणत्या चित्रपटातून किंवा शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.