अभिनेता गश्मीर महाजनी(Gashmeer Mahajani) गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहे. ‘फुलवंती’ चित्रपटातील अभिनेत्याचे काम आणि ‘एक राधा एक मीरा’ हा आगामी काळात प्रदर्शित होणारा चित्रपट यांमुळे गश्मीर महाजनी सातत्याने चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याबरोबरच विविध मुलाखतींमध्ये गश्मीरने त्यांच्या व्यावसायिक, तसेच खासगी आयुष्याबाबत केलेली वक्तव्येदेखील लक्ष वेधून घेतात. चित्रपटांकडे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन, अनुभव यांबद्दल त्याने मुलाखतींमधून वक्तव्य केले आहे. आता अभिनेत्याने एका मुलाखतीत तो त्याच्या वडिलांकडून काय शिकला, याबद्दल भाष्य केले आहे.

गश्मीर महाजनी म्हणाला…

गश्मीर महाजनीने नुकतीच ‘लोकशाही फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत अभिनेत्याने म्हटले, “मी आयुष्यात वडिलांकडून एक गोष्टी शिकलोय ती म्हणजे परिश्रमाला पर्याय नाही. अथक परिश्रम कशाला म्हणतात, हे माझ्या वडिलांकडे बघून शिकलो आहे. २४-२४ तास न थकता, काम करताना मी त्या माणसाला पाहिलं आहे. मीसुद्धा ही गोष्ट पाळतो. मी खूप थकलोय, आता मला आराम हवाय, हे माझ्याकडून बोललंच जात नाही. मला वाटतं ते आनुवांशिकपणेसुद्धा आलंय आणि बघून-बघून त्या संस्कारातूनसुद्धा आलं आहे.”

याच मुलाखतीत अभिनेत्याने वडिलांबरोबर चित्रपटात काम करण्याचा अनुभवसुद्धा सांगितला. त्याबरोबरच आईविषयी बोलताना प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात आई ही सर्वांत महत्त्वाची व्यक्ती असल्याचे म्हटले. यावेळी त्याने त्याची पत्नी व मुलाच्या बॉण्डिंगबद्दलही वक्तव्य केले.

गश्मीर महाजनी हा लोकप्रिय मराठी अभिनेते व दिग्दर्शक रवींद्र महाजनी यांचा मुलगा आहे. रवींद्र महाजनी हे ‘मुंबईचा फौजदार’, ‘झुंज’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘देवता’, ‘हळदी कुंकू’, ‘कशाला उद्याची बात’, ‘कळत-नकळत’, ‘देवघर’, अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांसाठी ओळखले जातात. २०२३ ला त्यांचे निधन झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गश्मीर महाजनी नुकताच फुलवंती या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटात त्याने साकारलेल्या भूमिकेचे मोठे कौतुक झाल्याचे पाहायला मिळाले. या चित्रपटात प्राजक्ता माळी प्रमुख भूमिकेत दिसली होती. आता अभिनेता लवकरच एक राधा एक मीरा या चित्रपटात एक नवीन भूमिका साकारत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे व सुरभी भोसले प्रमुख भूमिकांत दिसणार आहेत. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.