Gashmir Mahajani Received Marriage Proposal From A Female Fan : गश्मीर महाजनी मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. गश्मीर मराठीसह हिंदीतही काम करत असतो. त्याने अनेक चित्रपट व वेब सीरिजमधून आजवर काम केलं आहे. गश्मीर सोशल मीडियावरही सक्रिय असतो. अनेकदा यामार्फत तो त्याच्या खासगी आयुष्याबद्दलही सांगत असतो.

गश्मीर सोशल मीडियामार्फत त्याच्या कामासंबंधित अपडेट तसेच खासगी आयुष्यातील घडामोडी प्रेक्षकांबरोबर शेअर करत असतो. अशातच त्याने नुकतच इन्स्टाग्रामवर ‘आस्क मी’ हे सेशन घेतलं आहे, जिथे त्याने त्याच्या चाहत्यांनी त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. यावेळी गश्मीरला व्यावसायिक आयुष्यासह खासगी आयुष्याबद्दलही अनेक प्रश्न विचारण्यात आले.

गश्मीर महाजनीला चाहतीने घातली लग्नाची मागणी

गश्मीरला यावेळी त्याच्या एका चाहतीने माझ्याबरोबर लग्न करशील का? असा प्रश्न विचारला. यावर उत्तर देत गश्मीर म्हणाला, “माझं लग्न झालं ग आणि मी माझ्या बायको आणि परिवारासोबत खूप खूश आहे.” पुढे एकाने गश्मीरला बॉलीवूडमध्ये काम करायला आवडेल का आणि कोणत्या कलाकाराबरोबर काम करायला आवडेल असं विचारलं. यावर गश्मीरने “माझी तशी काही इच्छा नाही” म्हणत उत्तर दिलं.

गश्मीर महाजनी इन्स्टाग्राम स्टोरी

गश्मीर अनेकदा सोशल मीडियावर हे सेशन घेत असतो आणि त्याच्या चाहत्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत असतो. यावेळीसुद्धा त्याला अनेक वेगवेगळे प्रेश्न विचारले. यादरम्यान त्याचे चाहते त्याच्या चित्रपटांतील कामाचं कौतुकही करत असतात.

गश्मीर अनेक हिंदी वेब सीरिजमध्येही काम करताना दिसतो, त्यामुळे त्याचा चाहतावर्गही वाढत असल्याचं पाहायला मिळतं. त्याने आजवर ‘फुलवंती’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘धर्मवीर’, ‘बोनस’, ‘मला काहीच प्रॉब्लम नाही’, ‘डोंगरी का राजा’, ‘कान्हा’, ‘देऊळ बंद’, ‘कॅरी ऑन मराठा’ यांसारख्या अनेक चित्रपटांत काम केलं आहे. त्याने हिंदी मालिकेतही काम केलंय; तर गश्मीरने ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘श्रीकांत बशीर’, ‘तू जख्म हैं’, ‘गुन्हा’ यासारख्या हिंदी वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.

सध्या गश्मीर त्याच्या आगामी प्रॉजेक्टच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. येत्या काळात अभिनेता नवनवीन कलाकृतींमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.