Gautami Patil new Marathi Song in Premachi Gosht 2: ‘प्रेमाची गोष्ट २’ हा सिनेमा दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील तिसरं गाणं ‘दिसला गं बाई दिसला २.०’ रिलीज झालंय. पहिल्या दोन गाण्यांनंतर हे गाणंही चर्चेत आहे. ‘दिसला गं बाई दिसला २.०’ या नव्या आवृत्तीने जुन्या आठवणींना नवा झगमगाट दिला आहे. गौतमी पाटीलच्या अफाट एनर्जीने आणि ललित प्रभाकरच्या जबरदस्त साथीनं या गाण्याला एक वेगळंच रूप मिळालं आहे.

राम कदम आणि अविनाश-विश्वजीत यांच्या जोशपूर्ण संगीतासह जगदीश खेबुडकर आणि विश्वजीत जोशी यांचे बोल लाभलेलं हे गाणं अधिकच श्रवणीय बनलं आहे. राधा खुडे, आदर्श शिंदे आणि विश्वजीत जोशी यांच्या आवाजात हे गाणं आणखीनच रंगतदार झालं आहे. पॉल मार्शलच्या नृत्यदिग्दर्शनाने याला आणखी रंगत आली आहे.

‘दिसला गं बाई दिसला २.०’ हे गाणं संगीतप्रेमींच्या पसंतीस येण्याचं कारण म्हणजे, गाण्याचे पूर्वीचे बोल आणि नव्या बीट्सचा सुंदर संगम. पारंपरिक तालात आधुनिक झंकाराची मिसळ, आणि गौतमी पाटीलच्या स्फूर्तीदायक सादरीकरणामुळे हे गाणं तरुणाईचं नवीन फेव्हरेट ठरतंय.

पाहा गाणं

दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले, ”हे गाणं तयार करतानाच आमच्या मनात तरुणाई होती. जुनं गाणं नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचं होतं, परंतु त्याचा सार कायम ठेवायचा होता. गौतमी पाटीलच्या एनर्जीमुळे गाण्याला जिवंतपणा आला आणि तिचा परफॉर्मन्सच या गाण्याचं आकर्षण ठरलं.”

निर्माते संजय छाब्रिया म्हणाले, ”’प्रेमाची गोष्ट २’ मधली पहिली दोन गाणी प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारली आणि त्या प्रतिसादानं आम्ही उत्साहित झालो आहोत. आता ‘दिसला गं बाई दिसला २.०’ या गाण्याने तो उत्साह आणखी वाढवलाय. जुना ठेका आणि नव्या तालाची सांगड हाच या गाण्याचा आत्मा आहे.”

‘प्रेमाची गोष्ट २’ चे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केलं आहे. ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २१ ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.