Santosh Dhavakhar Talks About Gondhal Film : ‘कांतारा’, ‘दशावतार’ या चित्रपटांनंतर आता प्रेक्षकांच्या भेटीला मातीतली गोष्ट सांगणारा अजून एक नवीन चित्रपट लवकरच येणार आहे. टीझर प्रदर्शित झाल्यापासून या चित्रपटाबद्दल अनेकांमध्ये उत्सुकता असल्याचं दिसतं. हा चित्रपट म्हणजेच ‘गोंधळ’. परंतु, असं सगळं असताना चित्रपटाच्या दिग्दर्शकानं मात्र प्रेक्षकांना वेगळच आवाहन केलं आहे.
‘गोंधळ’ या चित्रपटाचं दिग्दर्शन संतोष डावखर यांनी केलं असून, हा चित्रपट येत्या १४ नोव्हेंबरला चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे आणि आता २९ ऑक्टोबरला चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे. ‘कांतारा चॅप्टर १’बरोबर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि तेव्हापासून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. परंतु, आता चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्याआधी दिग्दर्शक संतोष डावखर यांनी याबद्दल प्रतिक्रिया देत आवाहन केलं आहे.
गोंधळ चित्रपटाचा ट्रेलर पाहू नका – संतोष डावखर
‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दल सांगितलं आहे. गोंधळ या चित्रपटाच्या ट्रेलरबद्दल संतोष डावखर म्हणाले, “२९ ऑक्टोबरला संध्याकाळी ट्रेलर प्रदर्शित होत आहे. मी सर्व सिनेरसिकांना आग्रहाची विनंती करेन की, जर तुम्ही चित्रपटगृहांत जाऊन हा चित्रपट बघायचं ठरवलं असेल, तर कृपया याचा ट्रेलर पाहू नका. कारण – याच्या स्क्रीनप्लेमध्ये एकेका पात्राची गूढता, वेगळेपण हे सगळं खूप रंजक आहे. ते पात्र जसजसं तुम्हाला कळत जाणार तसतसं चित्रपटाची कथा पुढे सरकते. त्यामुळे जर तुम्ही ट्रेलर पाहिला, तर चित्रपटगृहांत चित्रपट पाहण्याची जी मजा आहे, ती कुठेतरी एक टक्क्याने कमी होऊ शकते.”
दिग्दर्शक संतोष डावखर पुढे म्हणाले, “त्यामुळे मी तुम्हाला हे आवर्जून सांगेन की, जर तुम्ही चित्रपट बघायचा की नाही याबद्दल अजून काही ठरवलं नसेल, तर तुम्ही ट्रेलर पाहा. पण, जर तुम्ही चित्रपट बघायचाच आहे, असं ठरवलं असेल, तर हा ट्रेलर पाहू नका, असं आवाहन मी करेन.”
गोंधळ या चित्रपटात अनेक लोकप्रिय कलाकार पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाला पद्मविभूषण इल्लैयाराजा यांनी संगीत दिलं आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांनी खास नाशिक येथे जाऊन गोंधळ आणि ही संस्कृती नेमकी काय आहे याचा दोन दिवस अभ्यास केल्याचं संतोष डावखर यांनी या मुलाखतीत सांगितलं आहे.
