‘बिग बॉस’ मराठीच्या पाचव्या पर्वाची बरीच चर्चा झाली.’ बिग बॉस’ मराठीचं हे पर्व सूरज चव्हाण, निक्की तांबोळी, अंकिता वालावलकर, जान्हवी किल्लेकर या स्पर्धकांनी गाजवलं होतं. ‘बिग बॉस’ने दिलेल्या टास्कदरम्यान या स्पर्धकांमध्ये अनेकदा भांडणं, बाचाबाची होताना दिसली. जान्हवी, निक्की या दोघी तर बऱ्याचदा त्यांनी केलेल्या विधानांमुळे ट्रोलही झाल्या. अशातच आता या दोघी पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. याचं निमित्त म्हणजे सूरज चव्हाणची मुख्य भूमिका असलेला ‘झापुक झुपूक’ चित्रपट. हा चित्रपट शुक्रवारी (२५ एप्रिल २०२५ रोजी) प्रदर्शित झाला.
‘झापुक झुपूक’ चित्रपटाला प्रदर्शित होऊन आज सात दिवस झाले आहेत. या चित्रपटाच्या टीझर व ट्रेलरची प्रचंड चर्चा झाली, त्यामुळे या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता होती, पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मात्र त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अशावेळी सूरजला पाठिंबा देण्यासाठी जान्हवी किल्लेकर व निक्की तांबोळी यांनी ‘झापुक झुपूक’चे शो बुक केले आहेत. याबद्दलची माहिती जान्हवी व निक्की यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून मिळत आहे. केतन माणगावकर यांनी इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करीत याबद्दल सांगितलं आहे. केतनने स्टोरीमार्फत म्हटलं आहे की, “‘बिग बॉस’ म्हणजे भांडणं, ‘बिग बॉस’ म्हणजे क्लेश… ‘बिग बॉस’च्या आतली नाती म्हणजे दिखावा, असे अनेक आरोप झाले आणि ह्यापुढेही होतील. पण, एका गोष्टीचं कौतुक करावसं वाटतं.सिझन संपून काळ लोटलाय. आता नव्या सिझनची वाट पाहू लागलेत लोक.”
याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले,”अशा वेळी सूरजच्या सिनेमासाठी ‘झापुक झुपूक’साठी ‘बिग बॉस’ मराठीचे इतर सदस्य उभे राहिलेत हे पाहून कौतुक वाटतं. “जान्हवी आणि निक्की ह्यांना खूप काही बोललं गेलं, पण आज त्याच दोघींनी अख्खं थिएटर बुक करून सूरजच्या पाठीमागे उभं राहायचं ठरवलं. आता काही ट्रोलर्स म्हणतील हा पब्लिसिटी स्टंट आहे, पण मग त्यांनी एकतरी तिकीट काढून दाखवावं. कारण फुकट बोलणं सोप्प आहे. थिएटर बुक करणं कठीण…मला एवढचं वाटतं, जिथे मराठी माणूस पाय खेचण्यासाठी बदनाम आहे, तिथे ह्या दोघींचं आणि त्या प्रत्येक ‘बिग बॉस’ मराठीच्या सदस्याचं कौतुक आहे.”
जान्हवी व निक्की यांच्या या कृतीने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे, तर त्यांनी सूरजला दिलेल्या या पाठिंब्यामुळे त्यांच्या चाहत्यांकडून त्यांचं कौतुक होत आहे, तर जान्हवी व निक्की पुन्हा त्यांच्या कामात सक्रिय झाल्या आहेत. जान्हवी ‘स्टारप्रवाह’ वाहिनीवरील ‘अबोली’ या मालिकेत दिसली, तर निक्कीसुद्धा ‘स्टारप्रवाह’वरील ‘शिट्टी वाजली रे’ या कार्यक्रमात पाहायला मिळत आहे.