Kapil Honrao Talk About Ritesh Deshmukh : मनोरंजन विश्वात अशी अनेक कलाकार मंडळी आहेत, जी कोणाचा तरी आदर्श घेऊन या क्षेत्रात आली आहेत. शाहरुख, सलमान आणि आमिर खान या कलाकारांना मोठ्या पडद्यावर पाहून अनेक गाव-खेड्यांतल्या तरुणांनी कलाविश्वात येण्याचं स्वप्न पाहिलं. पाठीशी कुणीच गॉडफादर नसतानाही मोठ्या पडद्यावर आपल्या आवडत्या कलाकाराला पाहून इंडस्ट्रीत येण्याचं स्वप्न अनेकांनी बघितलं आहे. असाच एक अभिनेता म्हणजे, कपिल होनराव.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतून कपिल अवघ्या घराघरांत पोहोचला. पण, कपिलनं मनोरंजन क्षेत्रात येण्यासाठी एक व्यक्ती कारणीभूत आहे, ती म्हणजे रितेश विलासराव देशमुख. रितेश देशमुखला बघून कपिलनं या क्षेत्रात येण्याचा आणि अभिनेता बनण्याचा प्रवास सुरू केला. याच प्रवासाबद्दल त्यानं नुकत्याच एका मुलाखतीत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसंच कपिलनं रितेश देशमुखचा एक किस्सासुद्धा शेअर केला आहे.

लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत कपिल म्हणाला, “मला अभिनय क्षेत्रात यावं असं वाटलं, त्याचं कारण म्हणजे रितेश विलासराव देशमुख. २००३ मध्ये रितेश देशमुख यांचा ‘तुझे मेरी कसम’ हा हिंदी चित्रपट आला होता, तेव्हा त्या चित्रपटाची सर्वत्र क्रेझ होती; ती क्रेझ आजही आहे. लातूरमध्ये काही चित्रपटगृहांत हा चित्रपट आजही दाखवला जातो. त्या चित्रपटानंतर रितेश विलासराव देशमुख हे नाव संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालं.”

यापुढे किस्सा सांगताना कपिल म्हणाला, “‘तुझे मेरी कसम’नंतर आमच्या गावात बाईक रॅली निघाली होती. तेव्हा लाल टी-शर्ट, जीन्स आणि गॉगल अशा लूकमध्ये रितेशजी मला दिसले होते आणि त्यांना पाहिल्यानंतर माझ्या डोक्यात ‘आपणसुद्धा अभिनेता बनलं पाहिजे’ असा विचार आला. तिथून माझा अभिनेता बनण्याचा प्रवास सुरू झाला. ‘तुझे मेरी कसम’नंतर रितेश विलासराव देशमुख हे नाव महाराष्ट्राच्या घराघरांत माहिती झालं होतं आणि ते हिरो झाले होते. त्यांना मिळणारं ते प्रेम पाहून मी भारावून गेलो होतो आणि तेच प्रेम मलासुद्धा हवं अशी भावना माझ्या मनात आली होती.”

कपिल होनराव इन्स्टाग्राम पोस्ट

यापुढे कपिल सांगतो, “रितेश सर आणि मी एका चित्रपटात एकत्र काम करत आहोत; तर शूटिंगच्या निमित्ताने त्यांना मी हा किस्सा सांगितला. तेव्हा ते म्हणाले, ‘तू जी गोष्ट मला सांगत आहेस, तीच सेम गोष्ट मी शाहरुख खानला सांगितली होती. शाहरुख खानमुळे मी अभिनेता झालो.'”

यापुढे कपिल सांगतो, “मी हा किस्सा आजवर कुठेच शेअर केला नव्हता. खूप जपून ठेवला होता, कारण रितेश विलासराव देशमुख या माणसामुळे मी या इंडस्ट्रीत आलो, त्यामुळे ही गोष्ट मला सर्वात आधी त्यांनाच सांगायची होती.”