Kedar Shinde & Suraj Chavan : केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ सिनेमा २५ एप्रिलला प्रदर्शित झाला. यामध्ये ‘बिग बॉस मराठी’चा विजेता सूरज चव्हाणने प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून ‘झापुक झुपूक’ला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र, काही नेटकऱ्यांनी सूरजला ट्रोल केलं आहे. याबद्दल केदार शिंदेंनी इन्स्टाग्रामवर लाइव्ह येऊन आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.

सकाळी नऊ वाजता पहिला शो सुरू होतो आणि काही जणांनी पुढच्या पंधरा मिनिटांत ट्रोल करणारे व्हिडीओ शेअर केले, यांनी सूरजला ट्रोल करायचं, त्याचा सिनेमा फ्लॉप करायचा हे आधीपासूनच ठरवलं होतं. असा दावा केदार शिंदेंनी या त्यांच्या इन्स्टाग्राम लाइव्ह सेशनमध्ये केला आहे. ट्रोलर्सना खडेबोल सुनावत केदार शिंदे नेमकं काय म्हणालेत जाणून घेऊयात…

दिग्दर्शक म्हणाले, “सूरजला या सिनेमाच्या निमित्ताने एक वेगळं व्यासपीठ मिळालं. ज्या लोकांनी हा सिनेमा पाहिला त्यांनी सर्वांनी सूरजचं भरभरून कौतुक केलं आहे. पण, मी काही नकारात्मक कमेंट्स सुद्धा वाचतोय. काही लोक ठरवून सूरजबद्दल ही मतं मांडत आहेत. ती म्हणजे, हा माकडतोंड्या आहे, कसला दिसतो, याला काय येतं? बोबडा बोलतो अशा कमेंट्स लोक करत आहेत. पण, हे असं बोलणारे लोक सूरजने आतापर्यंत केलेली प्रगती पाहत नाहीयेत. त्याचा गावापासून सुरू झालेला प्रवास हा दृष्ट लागण्यासारखा आहे. त्यामुळे अशा प्रवृत्तीच्या लोकांना आताच आळा घातला पाहिजे.”

केदार शिंदे पुढे म्हणाले, “सूरजने या सगळ्या गोष्टींसाठी मला काही पैसे दिलेले नाहीयेत. तो स्वत: मेहनत घेऊन पुढे आला आहे. सूरज आजपर्यंत कसा होता यापेक्षा त्याने सिनेमात कसं काम केलंय हे पाहणं गरजेचं आहे. या ट्रोलर्सना वेळीच थांबवलं नाही तर, महाराष्ट्रातील गावाखेड्यातला मुलगा कधीच पुढे जाणार नाही. त्यामुळे आपण सगळ्यांनी मिळून त्याला पाठिंबा देण्याची गरज आहे. आज मी १७ सिनेमे केलेत आणि आताचा हा झापुक झुपूक माझा अठरावा सिनेमा आहे…मी प्रत्येक सिनेमात वेगवेगळ्या लोकांबरोबर काम केलं आहे.”

“एका युट्यूबरने टायटलमध्ये लिहिलं होतं. केदार शिंदेंनी जिओ सिनेमाला चुना लावला. पण, या चित्रपटासाठी आम्ही किती मेहनत घेतलीये हे त्यांनी पाहिलं नाही. ज्या लोकांनी सिनेमा पाहिलाय त्यांचाही खूप सकारात्मक आहे. माझं म्हणणं इतकंच आहे…सिनेमा पाहून ट्रोल करा, उगाच ट्रोल करू नका. तुम्ही सिनेमा न पाहता सूरजविषयी मत बनवू नका. आज सूरजसाठी वाईट वाटतंय कारण, त्याचा चेहरा पूर्णपणे उतरला होता. पण, लोकांनी ठरवून त्याला ट्रोल केलंय. सकाळी ९ चा पहिला शो असतो आणि अगदी सव्वा नऊला त्यांनी पहिला रिव्ह्यू दिला. मला नवल वाटलं की, पंधरा मिनिटांत या लोकांनी संपूर्ण सिनेमा कसा पाहिला? म्हणजे ठरवून ठेवलं होतं की, सूरज चव्हाणला ठोकायचं, त्याचा सिनेमा फ्लॉप गेलाच पाहिजे हे ठरवूनच ठेवलं होतं. तुम्ही असं सूरजला वाईट ठरवू शकत नाही म्हणूनच या सगळ्या गोष्टी मी तुमच्या सर्वांशी आज लाइव्ह येऊन बोललो.”

View this post on Instagram

A post shared by Kedar Shinde (@kedarshindems)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला चांगला अभिनय आणि वाईट अभिनय समजतो…कारण, एवढी वर्षे अनेक नटांना मी जवळून पाहिलंय. सूरजने त्याच्या पद्धतीने अप्रतिम काम केलं आहे. उगाच ट्रोल करू नका. त्याचे कष्ट बघा आणि मग बोला. एकदा सिनेमा पाहा आणि त्यानंतर नक्की फिडबॅक द्या.” असं केदार शिंदेंनी यावेळी सांगितलं.