मराठी अभिनेते व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते किरण माने सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. ते फेसबूकवर पोस्ट करून सामाजिक, राजकीय व मनोरंजन क्षेत्रातील विविध विषयांवर आपली मतं मांडत असतात. आता त्यांनी शरद पवारांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आली आहे.

गर्दीत एक कार्यकर्ता घोषणा देतो आणि त्याच्या आवाजावरून शरद पवार त्याला ओळखतात, असा हा व्हिडीओ किरण मानेंनी शेअर केला आहे. “नुस्त्या आवाजावरनं पवारसाहेबांनी कार्यकर्त्याचं नांव ओळखलं! ते अचूक निघालं!! काय अजब रसायन आहे राव हे…
८३ पेक्षा जास्त वय असलेल्या माणसाला जवळच्या नातेवाईकांची नावं आठवत नाहीत गड्याहो… अद्भूत स्मरणशक्ती… अफलातून उत्साह… तुम्ही पवारविरोधक किंवा द्वेष्टे असा, तुम्हाला या माणसाच्या या गोष्टींचीही तारीफ करता येत नसेल तर तुमची जिंदगी झंड आहे. आयुष्य नफरतीने चडफडत काढणार तुम्ही.
माझ्या कॉन्ट्रोव्हर्सीच्या वेळी पवारसाहेबांनी मला भेटायला बोलावलं होतं, तेव्हा त्यांच्या केबीनमध्ये दीड तास त्यांनी माझ्याशी चर्चा केली. अनेक विषय निघाले. तिथे फक्त साहेब, मी आणि प्रतापराव आसबे, तिघेच होतो. त्या दीड तासांवर मी एक छोटेखानी पुस्तक लिहू शकेन… खरंतर तेव्हापास्नं बर्‍याच जणांचा गैरसमज आहे की मी साहेबांचा माणूस आहे… लै हसतो मी अशा कमेन्टस् वाचल्यावर.
मला साहेबांविषयी आदर आहे तो अशा, या व्हिडीओत असलेल्या जगावेगळ्या गोष्टींमुळे. राजकारणी म्हणून मी अनेकदा टीकाही करतो. पण मी अभिनेता आहे. कुठलाही माणूस बारकाईनं बघतो. निरीक्षणातनं अंतर्बाह्य स्वभाव ओळखण्याचा छंद आहे मला. साहेबांना मी माझ्या लहानपणापास्नं बघतोय. त्यांच्या अनेक गोष्टींवर मी पोस्टस् लिहील्या आहेत. त्या सगळ्या पोस्टमध्ये ‘माणूस’ म्हणून त्यांचं वेगळेपण रेखाटलेलंच दिसेल तुम्हाला. कुठेही अंधभक्ती नाही दिसणार. अंधभक्त असतो तर त्यांच्या पक्षात प्रवेश केला नसता का मी?
लव्ह हिम ऑर हेट हिम… पवारसाहेबांसारखा नेता यापूर्वी कधी झाला नाही, यापुढेही होणार नाही!” अशी पोस्ट किरण मानेंनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, किरण मानेंच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. ‘शरदजी पवार साहेब महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाशी जोडलेले आहेत प्रत्येक कष्ट करायची जोडलेले आहेत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची जाण असणारा नेता म्हणजे शरद पवार’, ‘पवार साहेब मुख्यमंत्री असताना किल्लारी येथे भुकंप झाला होता त्यानंतर तब्बल तीस वर्षा नंतर ते किल्लारीत आले असता, नुसत्या घोषणेवर माणसाचे नाव पवार साहेबांनी ओळखले..’, अशा प्रतिक्रिया या पोस्टवर काही युजर्सनी दिल्या आहेत.