Kranti Redkar Shares Funny Video : मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकार हे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं मनोरंजन करीत असतातच; पण अनेकदा हे कलाकार त्यांच्या सोशल मीडियावरील विविध प्रकारच्या कंटेंटनंसुद्धा आपल्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. अशीच विविध व्हिडीओंच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी लोकप्रिय मराठी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर.

मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर ही तिच्या अभिनयानं कायमच चर्चेत राहत असते. मात्र, अभिनेत्री तिच्या अभिनयाव्यतिरिक्त सोशल मीडियाद्वारेही चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. क्रांती व तिच्या मुलींचे रील्स तर सोशल मीडियावर बरेच लोकप्रिय आहेत. अशातच तिनं आता एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून क्रांतीनं तिच्याच वडिलांनी तिला ओळखलं नसल्याचा एक गमतीशीर किस्सा सांगितला आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओत क्रांती म्हणते, “माझ्या बाबांना काही चेहरे आठवतच नाहीत आणि हे काही म्हातारपणामुळे नाही. याआधीही त्यांनी अनेकदा कधीच कोणाचे चेहरे ओळखलेले नाहीत. त्यांना येऊन कोणी सांगितलं, ‘अहो दिनूभाऊ… मी अमुक अमुक…’ त्यावर ते ‘अरे कशी आहेस?’ वगैरे प्रतिक्रिया देतात.”

पुढे क्रांती तिच्याबरोबर घडलेला किस्सा शेअर करीत म्हणते, “त्या दिवशी मी त्यांची स्वत:ची लेक मोठा चष्मा घालून घरात गेले. त्यांचा खूप चांगला मित्र मोरू यांच्याबरोबर मी घरात गेले. मोरूकाकांना दिसत नाही. तर मी आणि मोरूकाका घरात एकत्रच शिरलो. तर माझे पप्पा विचार करीत होते, मी त्यांचा मित्र मोरूबरोबर आलेली एक व्यक्ती आहे. मी घरात गेले आणि डायनिंग टेबलवर माझी एक जागा आहे, तिथे जाऊन बसले. ते हळूच माझ्याबद्दल मोरूकाकांना विचारतायत, ‘तुझ्याबरोबर आली आहे का?’ त्यावर मोरूकाका म्हणतात, ‘नाही, माझ्याबरोबर नाही आलीय.’ मग दोघं माझ्याकडे बघून स्माईल करीत होते. मीसुद्धा त्यांना हॅलो केलं.”

पुढे क्रांती सांगते, “मग त्या दोघांची आपसांत कुजबूज सुरू झाली की, ही अनोळखी बाई कोण आहे? थेट घरात कशी आलीय? आणि तेव्हा घरात आईसुद्धा नव्हती. मग मी ओरडले. अहो, पप्पा मी आहे. मग त्यांनी माझा आवाज ओळखला. त्यावर ते म्हणतात, ‘तरी म्हटलं हिला कुठे तरी पाहिलंय. ते मोठे चष्मे वगैरे घालून येत जाऊ नकोस. मोठी बाई दिसतेस. मी घाबरलो ना… मोरू म्हणतो माझ्याबरोबर नाहीय. मला तर तू ओळखीचीच वाटली नाहीस. तरी मी म्हणतोय, हिला जरा कुठे तरी पाहिलेलं वाटतंय.’ हे असं आहे.”

क्रांती रेडकर इन्स्टाग्राम व्हिडीओ

क्रांतीनं शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे. चाहतेच नव्हे तर, कलाकार मंडळींनासुद्धा क्रांतीचा हा मजेशीर व्हिडीओ आवडला आहे. अभिनेत्री प्रिया बेर्डे, साक्षी गांधी, स्नेहलता वसईकर यांनी हसण्याच्या इमोजीद्वारे या व्हिडीओवर त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, क्रांती ही मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘जत्रा’, ‘अगंबाई अरेच्चा’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘खो खो’सारख्या सिनेमांतून तिनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तसेच काही मालिकांमध्येही तिनं काम केलं आहे. इतकंच नव्हे, तर तिनं रिअ‍ॅलिटी शोमधील परीक्षकाचीही भूमिका निभावली आहे; पण मुलींच्या जन्मानंतर क्रांतीनं सिनेसृष्टीतून काहीसा ब्रेक घेतल्याचं पाहायला मिळालं. परंतु, क्रांती सोशल मीडियाद्वारे नेहमीच चाहत्यांचं मनोरंजन करते. अशातच तिचा हा व्हिडीओ अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.