मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री, तसेच निर्माती क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. सोशल मीडियावर ती तिचे तसंच तिच्या लेकीचे अनेक मजेशीर किस्से शेअर करत असते. क्रांतीने आजवर काही चित्रपट व नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. क्रांतीने तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. यात तिने अंकुश चौधरी, भरत जाधव तसंच विजय चव्हाण यांच्याबरोबर काम केलं आहे.
क्रांतीने ‘तू तू मी मी’ नाटकाच्या वेळी काही गुंड त्यांना मारायला त्यांच्या बसमागे धावत आल्याचा एक जुना किस्सा शेअर केला आहे. क्रांतीने नुकताच ‘मिरची मराठी’शी संवाद साधला. यावेळी तिने तिच्या नाटकाच्या कारकीर्दीविषयी विचारण्यात आलं. तेव्हा तिने नाटकाबद्दल जुना किस्सा सांगितला. या नाटकात तिच्याबरोबर अंकुश चौधरी, भरत जाधव तसंच विजय चव्हाण हे कलाकारदेखील होते.
यावेळी क्रांती असं म्हणाली, “माझ्या नाटकाच्या कारकिर्दीत तर असे अनेक किस्से झाले आहेत. एक प्रयोग होता. कदाचित फलटण की कुठे तरी होता. त्या नाटकात सुरुवातीच्या एन्ट्रीला विजय चव्हाण मोरुच्या मावशीच्या ड्रेसमध्येच म्हणजेच साडीमध्ये असतात. तर एक माणूस आला आणि कदाचित तो थोडासा दारू प्यायलेला होता. तो तिकडचा कोणीतरी मोठा माणूस होता. कदाचित नगरसेवक वगैरे असावा.”
यापुढे क्रांती म्हणाली, “त्या माणसाने विजय चव्हाणांना त्या ड्रेसमध्ये बघितलं आणि म्हणाला की, ‘तुम्ही हे नाटक नाही कारायचं, तुम्ही ‘मोरुची मावशी’ सादर करा.’ त्याने तो हट्टच धरला होता. तेव्हा आम्ही सगळे म्हणालो की, ‘अरे नाटक ‘तू तू मी मी’ आहे’. पण त्याचं असं म्हणणं होतं की, ‘नाही ‘मोरुची मावशी’च करा; नाहीतर सेट तोडून टाकेल’ वगैरे वगैरे. मग अंकुश चौधरी त्याला भिडला. ‘याला काय अर्थ आहे. तुम्ही आमच्याशी असं बोलू शकत नाही’ वगैरे वगैरे असं तो म्हणत होता.”
यापुढे क्रांतीने सांगितलं, “तेव्हा बॅकस्टेजची सगळी मंडळी अंकुशला शांत करत होती की, ‘अंक्या शांत हो. नाहीतर ही सगळी मंडळी आपल्याला मारतील’. त्यानंतर त्या माणसाच्या कार्यकर्त्यांनी कसंतरी करून त्याला बाजूला काढलं. त्यावर तो माणूस म्हणाला, ‘ठीक आहे, तुम्हाला हे नाटक करायचं आहे ना? करा करा. पण नाटक झाल्यानंतर पुढे इथून तुम्ही कसे बाहेर पडता तेच बघतो’.”
यापुढे क्रांतीने म्हटलं, “मग आम्ही ते नाटक आवरतं घेतलं. म्हणजे ते नाटक दोनेक तासांचं होतं; तर आम्ही ते दीड तासांत संपवलं. कमी महत्त्वाच्या पात्रांचे प्रवेश कमी केले. कसंतरी ते संपवलं. सेट वगैरे काढला आणि जेवण वगैरे न करता आम्ही तिथून बसमधून निघालो. मग बाकीचे गुंड आमच्या बसमागे काठ्या घेऊन आम्हाला मारायला धावत होते. तेव्हा आमचं असं झालेलं की, लवकर बस पळवा…”
यापुढे क्रांती म्हणाली, “ही एखाद्या चित्रपटाची घटना वाटू शकते; पण हे खरं घडलं आहे. अंकुश चौधरी, भरत जाधव यांना याबद्दल माहीत आहे. हे झालं आहे. आम्ही पळालो. हे असं नेहमी नाही होतं. लोकांना वाटेल की मराठी नाटकांच्या बाबतीत हे होतं. पण नाही हे असं क्वचितच कधी तरी होतं.”