हेमंत ढोमे(Hemant Dhome) दिग्दर्शित ‘फसक्लास दाभाडे’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २४ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये अमेय वाघ, क्षिती जोग व सिद्धार्थ चांदेकर हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने हे कलाकार गेल्या काही दिवसांपासून मोठ्या चर्चेत आहेत. विविध मुलाखतींमधील त्यांच्या वक्तव्याची चर्चा होताना दिसत आहे. आता हेमंत ढोमे व क्षिती जोगने एका मुलाखतीत त्यांच्या लग्नाबद्दल सांगितले आहे. लग्नाचा जेव्हा निर्णय घेतला, त्यावेळी जवळच्या लोकांची प्रतिक्रिया काय होती, यावरदेखील त्यांनी वक्तव्य केले आहे. क्षिती जोगने जवळची मैत्रीण मुग्धा कर्णिकला जेव्हा हेमंत ढोमेबरोबर लग्न करत असल्याचे सांगितले, त्यावेळी मुग्धा कर्णिकची काय प्रतिक्रिया होती हेही सांगितले आहे.

तिला मी जेव्हा हेमंतबरोबर लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं, तेव्हा…

क्षिती जोग व हेमंत ढोमेने नुकतीच लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याच्या निर्णयावर हेमंत ढोमेने म्हटले की, प्रेमात पडल्याची जाणीव आधी मला झाली. पण, मी थेट लग्न करण्याचे ठरवले. कारण मला असं वाटायचं की आपल्या आयुष्यात अशी व्यक्ती यायला हवी की जी खूप महत्वाकांक्षी असेल, आपल्या महत्वाकांक्षा समजून घेईल, आपल्याला पाठिंबा देईल. तिच्याशी बोलता-बोलता मला समजलं की ती स्वत: खूप महत्वाकांक्षी आहे. मेहनती आहे, आपल्याला सांभाळू शकते. तर मग मी विचार केला की लग्नच करायचं. मी माझ्या एक-दोन मित्रांनाही सांगितलं. समीर, सिद्धार्थ चांदेकर होते, तर मी त्यांना सांगितलं की मला ती आवडते आणि मला लग्नच करायचं आहे. मग त्यांनाही प्रश्न पडले की वयामधील अंतर आणि ती या क्षेत्रात सीनिअर आहे. आम्ही दोन महिन्यात ठरवलं होतं की लग्न करायचं आहे.

क्षितीने यावर बोलताना म्हटले की माझी मुग्धा कर्णिक ही मैत्रीण आहे. जी आता झी मराठीच्या पारू मालिकेत अहिल्यादेवीचे पात्र साकारत आहे. ती माझी सगळ्यात जवळची आणि सगळ्यात जुनी मैत्रीण आहे. तिला मी जेव्हा हेमंतबरोबर लग्न करण्याच्या निर्णयाबद्दल सांगितलं, तेव्हा ती मला मला म्हणाली, तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस का? कारण तुमच्यात काहीच जुळत नाही, असं एक मत होतं. मी म्हटलं की मी ठाम नाहीये, पण माझं हे ठरलंय की हे करायच आहे. पुढे जे होईल ते आपण बघू. अशी आठवण क्षितीने सांगितली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, हेमंत ढोमेच्या ‘फसक्लास दाभाडे’ची गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ चांदेकर व मिताली मयेकर हे जोडपे ऑनस्क्रीन पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहे.