‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अनेक नवोदित कलाकारांना एक वेगळी ओळख मिळाली. अभिनेता श्रमेश बेटकर सुद्धा या शोमुळे घराघरांत लोकप्रिय झाला. आता लवकरच श्रमेशचा एक नवीन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं नाव आहे ‘लास्ट स्टॉप खांदा’. या सिनेमाचं लेखन श्रमेशने केलं असून यामध्ये तो मुख्य भूमिकेत देखील झळकणार आहे.
श्रमेश बेटकरसह या सिनेमात जुईली टेमकर, निखिल बने, प्रभाकर मोरे, धनश्री काडगांवकर, मंदार मांडवकर ही कलाकार मंडळी महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. हा सिनेमा येत्या २१ नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय. त्याआधी या सिनेमाची संपूर्ण टीम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर पोहोचली होती.
राज ठाकरे व त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या सगळ्या कलाकारांसह दिलखुलास संवाद साधला. राज ठाकरे यांची भेट घेतल्यावर सिनेमातील कलाकारांनी खास पोस्ट देखील शेअर केल्या आहेत.
‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेमुळे सर्वत्र लोकप्रिय झालेली अभिनेत्री धनश्री काडगांवकर राज ठाकरे यांची भेट घेतल्यावर पोस्ट शेअर करत लिहिते, “अनेक वर्ष ज्या क्षणाची वाट पाहात होते, तो क्षण आज माझ्या आयुष्यात आला… शर्मिला वहिनींची भेट झाली. कलाकारांवर प्रामाणिक प्रेम करणारे आणि सदैव मराठी कलाकारांच्या पाठीशी उभे राहणारे, ज्यांच्या नावातच जरबही आहे आणि एक जादुई करिष्मा आहे. तिच जरब, तिच जादू आज राज साहेब ठाकरे यांना प्रत्यक्षात भेटल्यावर दसपटीने जाणवली. साहेबांनी ‘लास्ट स्टॉप खांदा’च्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल खूप खूप आभार”
याशिवाय अभिनेता निखिल बने याने देखील राज ठाकरेंबरोबरचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. निखिल म्हणतो, “लास्ट स्टॉप खांदा’ सिनेमाच्या प्रमोशन निमित्ताने राजसाहेब ठाकरे आणि शर्मिलाताई ठाकरे यांची भेट झाली. एक अविस्मरणीय आणि विलक्षण अनुभव”
दरम्यान, ‘लास्ट स्टॉप खांदा’ हा सिनेमा २१ नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन विनित परुळेकरने केलं असून श्रमेश बेटकरने या सिनेमाचं लेखन केलं आहे.
