आयुष्याचा प्रवास सुरू झाला की प्रत्येकाला प्रेमाच्या स्टॉपवर थांबावंसं वाटतंच, काही जण थांबतात, काही जण रमतात, काही जण भेटतात. प्रवास पुढे सुरू राहतो, पण त्या स्टॉपवरचं रेंगाळणं मनात साठून राहतंच. अशीच प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट असलेला ‘लास्ट स्टॉप खांदा’ हा संगीतमय चित्रपट २१ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर समाजमाध्यमांवर प्रदर्शित करण्यात आले आहे.
शिवम फिल्म क्रिएशन सिग्नेचर टय़ून्स, स्नेहा प्रॉडक्शन्स यांनी ‘लास्ट स्टॉप खांदा’ प्रत्येकाच्या प्रेमाची गोष्ट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सचिन कदम आणि सचिन जाधव यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. प्रदीप मनोहर जाधव हे या चित्रपटाचे निर्माते असून सचिन कदम, अमृता सचिन जाधव सहनिर्माते आहेत.
श्रमेश बेटकर लिखित या चित्रपटाचं दिग्दर्शन विनीत परुळेकर यांनी केलं आहे. या चित्रपटात अभिनेता श्रमेश बेटकर, अभिनेत्री जुईली टेमकर, निखिल बने, मंदार मांडवकर, शशिकांत केरकर अशा कलाकारांच्या भूमिका आहेत. तर पाहुणे कलाकार म्हणून प्रभाकर मोरे, धनश्री काडगावकर, अशोक ढगे यांनी काम केले आहे. चित्रपटाचे छायांकन हरेश सावंत यांचे असून कलादिग्दर्शक केशव ठाकूर आहेत. श्रेयस राज आंगणे, श्रमेश बेटकर लिखित गीतांना श्रेयस राज आंगणे आणि किशोर मोहिते यांचे संगीत लाभले आहे.
प्रेमाच्या नात्याचा वेध आजवर अनेक चित्रपटांमधून घेतला गेला आहे. तरीही प्रेम या संकल्पनेच्या नवनव्या गोष्टी चित्रपटांतून मांडल्या जातात. ‘लास्ट स्टॉप खांदा..’ या चित्रपटातूनही अशीच एक नावीन्यपूर्ण कहाणी मांडण्यात आली आहे. या गोष्टीला श्रवणीय संगीताचीही साथ आहे.