‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम अगदी घराघरात प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमातून प्रसिद्धीझोतात आलेले कलाकार म्हणून समीर चौगुलेंकडे पाहिले जाते. प्रत्येक स्किटमध्ये ते प्रेक्षकांना खळखळून हसवतात. यावेळी त्यांनी केलेले अनेक विनोद प्रेक्षकांच्या अगदी तोंडपाठ झाले आहेत. समीर चौगुले हे नेहमीच विविध विषयांवर भाष्य करत असतात. नुकतंच समीर चौगुले यांनी त्यांच्या केसांवरील विनोदाबद्दल भाष्य केले.

‘लोकसत्ता डिजीटल अड्डा’च्या निमित्ताने समीर चौगुलेंनी विविध विषयांवर भाष्य केले. यावेळी समीर चौगुले यांना केसांवरील विनोदांबद्दल विचारण्यात आले. यावर उत्तर देताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर स्पष्टीकरण दिले.
आणखी वाचा : “पहिलं आणि शेवटचं…” शिव ठाकरेबद्दलचा प्रश्न विचारल्यानंतर वीणा जगताप संतापली

समीर चौगुले काय म्हणाले?

“मला असे वाटतं की स्वत:वर केलेला विनोद हा सर्वोत्कृष्ट विनोद असतो. हे मला कुठेतरी पु.ल देशपांडेंच्या साहित्यातून शिकायला मिळाले. पु. ल. देशपांडे हे माझं दैवत आहेत. त्यांचं कोणतंही साहित्य आज आपण पाहिलं तर त्यांनी स्वत:वर विनोद केले आहेत. ‘वक्ती आणि वल्ली’ किंवा ‘असा मी असामी’ यातील अनेक विनोद, त्यातील भावना या मला आवडत गेल्या. चार्ली चाप्लीनबद्दल मला तेच वाटतं. त्याचे खिसे फाटलेले आहे, अशाप्रकारे तोही स्वत:वर विनोद करायचा. त्याच्या मागे त्याची सतत फजिती होते. आर. के. लक्ष्मण हे देखील सर्वसामान्य माणसांवर विनोद करायचे. ती भावना मला फार आवडते.

सध्या विनोद करण्याची आमचे मापदंड हे देखील फार कमी कमी होत चालली आहेत. लोक कशावर काय चिडतील आणि लोकांच्या भावना या काचेपेक्षाही नाजूक झालेल्या आहेत. त्यामुळे मग उरत काय तर मी गौरववर विनोद करायचे आणि गौरवने माझ्यावर विनोद करायचे. ते तरी आम्हाला करु द्या. लोक कशावर आक्षेप घेतील याबद्दल काहीही कल्पना नाही”, असे समीर चौगुलेंनी यावेळी सांगितले.

आणखी वाचा : “यहां कौन विक्रम कौन वेधा?” पतीचा फोटो शेअर करत हेमांगी कवीने विचारला प्रश्न

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान अभिनेते समीर चौगुले हे आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा त्याची चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे पडद्यावर वावरणारा हा कलाकार खऱ्या आयुष्यातही अत्यंत साधा आहे. याच साधेपणामुळे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.