Mahesh Manjrekar Journey : बॉलीवूडसह मराठी सिनेविश्वात आपल्या अभिनय आणि दिग्दर्शनाने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारे अभिनेते, निर्माते व दिग्दर्शक म्हणजे महेश मांजरेकर. आजवर त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. बॉलीवूडसह मराठी इंडस्ट्रीला अनेक दर्जेदार चित्रपटांची पर्वणी घडवून आणणाऱ्या महेश मांजरेकरांनी एकेकाळी गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरुन बँकेत नोकरी केली होती. पण इथेही त्यांचं मन रमलं नाही. त्यामुळे त्यांनी या नोकरीचा राजीनामा दिला आणि पुन्हा आपल्या आवडीच्या क्षेत्रात एन्ट्री घेतली.
महेश मांजरेकरांनी नुकताच लोकमत फिल्मीशी संवाद साधला. या संवादात त्यांनी त्यांच्या गर्लफ्रेंड, नोकरी आणि त्यांच्या या क्षेत्रातील एन्ट्रीबद्दल सांगितलं. याबद्दल महेश मांजरेकर असं म्हणाले की, “माझी एक गर्लफ्रेंड होती. तिचं म्हणणं होतं की, नोकरी करायची. कारण व्यवसाय अनिश्चित असतो. मग हे सगळं करत असताना बँकेची प्रवेश परीक्षा दिली. त्यानंतर निकाल येईपर्यंतच्या वेळेत मी नगरला जाऊन हापसे (बोअरवेल) खणले. ते दिवस चांगले होते. तेव्हा खूप मज्जा केली.”
यापुढे ते म्हणाले, “तेव्हा मी त्या कंपनीचा मॅनेजर होतो. माझ्या मित्राच्या काकाचीच ती कंपनी होती. घरापासून बाहेर राहणं काय असतं हे मी त्या काळात अनुभवलं. कुठेही राहण्याची तयारी असणं आणि जे मिळेल ते खाणं ही सवय मला तिकडे लागली. तेव्हा गर्लफ्रेंडच्या घरचे पण नोकरी बघ, नोकरी बघ असं सांगत होते. मग बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मला नोकरी लागली. बोअरवेलमध्ये जिथे कामाला होतो; तिथे तो सांगत होता की, तुला बँकेत मिळतात त्यापेक्षा तिप्पट पैसे देतो. पण गर्लफ्रेंडला नोकरीत अधिक सुरक्षितता वाटत होती. त्यामुळे मग शेवटी बँकेत नोकरी केली.”
यापुढे महेश मांजरेकरांनी सांगितलं की, “बँकेत काही केल्या मन लागत नव्हतं. तिकडे माझी खूप चिडचिड व्हायची. मी कायम अस्वस्थ होतो. जिथे रस्ता मिळेल तिथे गेलो आहे. त्यामुळेच आजवर इथे पोहोचलो आहे. कारण मी एखादी गोष्ट मिळत नाही, त्यामुळे तिथे थांबलो नाही. नाही मिळत तर पुढे जा, तुझ्या नशिबात नाही तर पुढे चल, हे माझं सुरुवातीपासूनच आहे. मग बँकेत मी अॅडवान्स डिपार्टमेंटमध्ये होतो. तर तिकडे सात तासांपैकी माझं काम जास्तीत जास्त फक्त १३ मिनिटांचं वगैरे होतं. तर तिकडे निराश व्हायला लागलो आणि सहा महिन्यांनी मी ती नोकरी सोडली.”
पुढे महेश महेश मांजरेकर म्हणाले, “त्या गर्लफ्रेंडबरोबर एक प्रॉब्लेम झाला आणि आम्ही वेगळे झालो. मग मला कोणी नोकरी कर असं सांगणारं नव्हतं. त्याकाळात मी थोडा मोकळा झालो. बँकेत असताना एक वर्कशॉप केलं होतं. त्या वर्कशॉपनंतर मला कोणीतरी सांगितलं की, विनय आपटे नाटक करत आहेत. तर मी तिकडे पोहोचलो. तेव्हा त्यांचं सगळं कास्टिंग झालेलं होतं. तेव्हा त्या नाटकात दोन गट होतं. त्यापैकी एका गटात मी गेलो. तेव्हा एका कलाकाराला मालिकेत रोल मिळाला, त्यामुळे त्याने ते नाटक सोडलं आणि त्याची भूमिका अतुल परचुरेने केली. त्यामुळे अतुल परचुरेची भूमिका मला मिळाली.”
पुढे महेश मांजरेकर म्हणाले, “त्या नाटकात तेव्हा सचिन खेडेकर, अतुल परचुरे, सुनिल बर्वे, राजाराम देशपांडे अशी सगळीच कलाकार मंडळी होती. पण तेव्हा ते नाटक तसं चांगलं चाललं नाही. त्यानंतर करायचं काय? या विचाराने आम्ही सगळे भविष्याबद्दल चर्चा करायचो. मग माझा क्षेत्रातला प्रवास सुरू झाला. तेव्हा मीच एक नाटक लिहिलं, ज्यात मी मुख्य अभिनेता आणि निर्माताही मीच झालो. ते उत्साहात केलेलं नाटक होतं, पण ते फार बरं नव्हतं. त्या नाटकामुळे माझं नुकसान झालं. पण त्याचं मला दु:ख नाही, आनंदच आहे. कारण काय करु नये, हे मला त्या पहिल्या नाटकातच कळलं.”