Mahesh Manjrekar wants to work with this Famous Actress: महेश मांजरेकर हे लोकप्रिय दिग्दर्शक व अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत. नुकताच त्यांना व्ही. शांताराम जीवनगौरव हा पुरस्कार जाहीर झाला आहे. लवकरच, ते ‘देवमाणूस’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटात त्यांच्याबरोबर रेणुका शहाणेदेखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

महेश मांजरेकर यांची भविष्यात ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर काम करण्याची इच्छा

महेश मांजरेकर व रेणुका शहाणे यांनी नुकताच ‘तारांगण’शी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, तुम्हाला स्क्रीनवर आवडणाऱ्या जोड्या कोणत्या? त्यावर रेणुका शहाणे म्हणाल्या, “मला अशोक सराफ व रंजना देशमुख यांची जोडी खूप आवडायची. शम्मी कपूर व राजश्री खूप आवडायचे. मला अमिताभ बच्चन व रेखा, तसेच जया बच्चन व संजीव कुमार यांची जोडी खूप आवडायची.” महेश मांजरेकर म्हणाले, “जया बच्चन व अमिताभ बच्चन यांची जोडी आवडायची. तसेच मला ऋषी कपूर व डिंपल या जोडीला स्क्रीनवर पाहायला आवडलं असतं.”

कोणत्या अभिनेत्रीबरोबर काम करायला आवडलं असतं, या प्रश्नाचं उत्तर देताना महेश मांजरेकर म्हणाले, “मला तब्बूबरोबर काम करायला आवडलं असतं. त्याबरोबरच रेखाबरोबर काम करायला आवडलं असतं.” पुढे महेश मांजरेकर म्हणाले, “मला छाया कदमबरोबर काम करायला आवडेल. ती कमालीची अभिनेत्री आहे.”

तसेच महेश मांजरेकर व रेणुका शहाणे यांनी या चित्रपटात एकमेकांबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. तसेच महेश मांजरेकर यांनी सलमान खान व शिवाजी साटम हे त्यांच्यासाठी देवमाणूस असल्याचे म्हटले. ही दोन्ही माणसं माझ्यासाठी कायम देवमाणसं राहतील, असे त्यांनी म्हटले. रेणुका शहाणे यांनी दुसऱ्या एका मुलाखतीत, ‘देवमाणूस’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये महेश मांजरेकर गुलाब केसात माळताना दिसत आहेत, त्या सीनचा किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, “तो सीन उत्स्फूर्तपणे घडलेला आहे. महेशनं झेंडूचं फूल दिलं होतं, तर मी म्हटलं की, झेंडू कसा माळणार डोक्यात? मग त्या अनुषगांनं तेजसनं त्यात बदल करून तो सीन शूट केला.” पती आशुतोष राणा यांनी कधी गुलाब दिलं आहे का? यावर बोलताना रेणुका शहाणे म्हणाल्या, “राणा सर मला शा‍ब्दिक गुलाब देतात. ते ज्या पद्धतीनं कौतुक करतात, त्यांच्या कविता या तर माझ्यासाठी गुलाबच आहेत.”

दरम्यान, देवमाणूस हा चित्रपट २५ एप्रिल २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.