Mahesh Manjrekar Praised Nana Patekar: महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘नटसम्राट’ हा चित्रपट २०१६ साली प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात नाना पाटेकर, मेधा मांजरेकर, मृण्मयी देशपांडे व विक्रम गोखले प्रमुख भूमिकांत दिसले.
‘कोणी घर देता का घर’ हा नाना पाटेकरांचा डायलॉग मोठ्या प्रमाणात गाजला. आजही या चित्रपटाची अनेकदा चर्चा होते. चित्रपटात काम केलेल्या कलाकारांबाबत बोलले जाते. आता महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत नाना पाटेकरांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता, यावर वक्तव्य केले आहे.
या सगळ्यांना वाटलेलं हा चित्रपट होणार नाही
महेश मांजरेकर यांनी नुकतीच ‘लोकमत फिल्मी’ला मुलाखत दिली. त्या मुलाखतीत नटसम्राट या चित्रपटात नाना पाटेकर यांच्याबरोबर काम करण्याच्या अनुभवाबद्दल महेश मांजरेकर म्हणाले, “जेव्हा मी चित्रपटात नानाला घ्यायचं ठरवलं तेव्हा इंडस्ट्रीतले, इंडस्ट्रीबाहेरचे, माझ्या घरचे या सगळ्यांना वाटलेलं हा चित्रपट होणार नाही. कारण- नानाची ख्याती आहे की, तो कणखर आहे. तो तसाच आहे. मस्त माणूस आहे. माझीसुद्धा ख्याती तीच आहे. तर कसं होणार? असं सगळ्यांना वाटलेलं. पण, मी म्हटलेलं की, मी करेन.
“विक्रम गोखले माझा आवडता नट आहे. तो माझा मित्र होता. आम्ही जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलो तेव्हा तो स्टार होता; पण तो नंतर मित्र झाला. अभिनेता म्हणून उत्तम होता. शिकण्याची एक शाळा होता. मला हे दोघे नाटकात मिळाले.
“नाना आहे म्हणून नाही, तर मला पहिल्यापासून असं वाटायचं की, मी जेव्हा सिनेमा किंवा नाटक करीन, तर मी म्हणेन तसं व्हायला हवं. तो माझा दृष्टिकोन असायला हवा. मग तो चुकला तरी माझा दृष्टिकोन असायला हवा. अमुक हा चित्रपट मला एका पद्धतीनं दिसत असेल, तर तसाच दिसायला हवा. कोणी मला सुचवलं आणि त्याचं जास्त बरं असेल, तरी मी ते घेणार नाही. कारण- सगळेच सुचवत जातात.”
पुढे महेश मांजरेकर म्हणाले, “लोकांना वाटायचं नाना त्रास देईल; पण नानानं मला अजिबात त्रास दिला नाही. चित्रपट छान झाला. मध्ये दोन-तीन वेळा खटके उडाले. पण, मी त्यासाठी तयार होतो. मी हट्टी आहे. आता नानानं चित्रपट दिग्दर्शित केला, तर मी त्याचं ऐकेन. कारण- तो त्याचा दृष्टिकोन असेल. मला त्याचं काय आवडलं, तर त्यानं माझ्यापुढे जाण्याचा कधी प्रयत्न केला नाही. नाना आदरानं वागला. ते त्याचं श्रेय आहे.”
“चित्रपटात नानाचा आणि विक्रमचा एक सीन आहे, ज्यामध्ये विक्रम त्याला मारतो आणि म्हणतो की, तुझ्याइतका नीच माणूस बघितला नाही. तो नानानं करू दिला. त्यासाठी नानाचं कौतुक आहे. दुसरा एखादा कलाकार असता, तर म्हणाला असता की, माझा एवढा अपमान करायचा नाही. पण, नानानं ते करू दिलं. थोडा हट्टी आहे. पण, जर तुम्हाला तुमचं काम माहीत असेल, तर नानासारखा काम करण्यासाठी माणूस नाही”, या शब्दांत महेश मांजरेकरांनी नाना पाटेकरांचे कौतुक केले.