Punha ShivajiRaje Bhosle Movie Teaser : महेश मांजरेकर मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. आजवर त्यांनी अनेक विविध कथानक असलेल्या चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन केलं आहे. सध्या ते त्यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहेत.
महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट त्यांच्या २००९ साली आलेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या सुप्रसिद्ध चित्रपटाचा सिक्वल आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ बोडके मुख्य भूमिकेतून झळकणार आहे.
महेश मांजरेकर यांच्या ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘झी स्टुडिओ मराठी’ने त्यांच्या सोशल मीडिया पेजवरुन हा टीझर शेअर केला आहे. टीझरमध्ये चित्रपटाची झलक पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या टीझरमध्ये सुरुवातीला “मराठी लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे, आमच्या सोसायटीत आम्ही घाटी लोकांना ठेवत नाही” असं ऐकू येतं. पुढे सिद्धार्थ बोडकेची एन्ट्री होताना दिसते. धोतर, खांद्यावर घोंगडं, हातात काठी असा त्याचा लूक पाहायला मिळत असून तो घोड्यावरून उतरताना दिसतो. यावेळी अभिनेत्याच्या लूकने लक्ष वेधलं आहे.
सिद्धार्थची एन्ट्री झाल्यानंतर तो तेथील लोकांना “काय झालं, भांडण कशावरून सुरू आहे?” असं विचारतो; त्यावर तेथील लोक “सोसायटीचा नियम आहे, घाटी लोकांना घर नाही देत आम्ही” असं म्हणतात. त्यानंतर सिद्धार्थ “घाटी कोणाला म्हणतात माहितीये का? घाटी म्हणजे घाटावर राहणारे,घाट म्हणजे या महाराष्ट्र भूमीत स्वराज्यासाठी रक्त सांडलेल्या शूरवीरांना अभिमानाने अंगाखांद्यावर मिरवणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगा. रांगांमध्ये राहणारा रांगडा गडी म्हणजे घाटी. त्याला त्याच्याच राज्याच्या राजधानीत तुम्ही राहू देणार नाही”, असं म्हणताना दिसतो. सिद्धार्थने त्याच्या अभिनयानेही लक्षं वेधून घेतलं आहे.
टीझरमध्ये पुढे घाटी माणसाचं महत्त्व, त्याची ओळख, इतिहास या सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं. एकूणच मुंबईत मराठी माणसाची सद्य परिस्थिती, त्याला मिळत असलेली वागणूक अशा गोष्टींवर भाष्य करण्यात आल्यचं यामधून पाहायला मिळतं.
टीझरमधून सिद्धार्थ बोडकेचा रांगडा लूक पाहायला मिळतोय. त्याचे संवाद, हावभाव या गोष्टी लक्षवेधी ठरत आहे. एकूणच महेश मांजरेकरांच्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे. या टीझरवर अनेक कलाकारांनी तसेच नेटकऱ्यांनी कमेंट्स करत सिद्धार्थचं कौतुक करत चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं आहे.
‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ हा चित्रपट येत्या ३१ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सिद्धार्थ बोडकेबरोबर अभिनेते सयाजी शिंदे, विक्रम गायकवाड, मंगेश देसाई, शशांक शेंडे, पृथ्वीक प्रताप, पायल जाधव, त्रिशा ठोसर यांसारखे अनेक कलाकार झळकणार आहेत.