राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘पाणी’ चित्रपट १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राची निर्मिती असलेला ‘पाणी’ चित्रपट आदिनाथ कोठारेने दिग्दर्शित केला आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. हा टीझर पाहून प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे. अशातच चित्रपटाच्या शीर्षकगीताने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘पाणी’ चित्रपटाचं शीर्षकगीत नुकतंच प्रदर्शित झालं आहे.

राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स प्रस्तुत कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘पाणी’ चित्रपटातील मनाला उभारी देणारे ‘नगं थांबू रं’ हे शीर्षकगीत प्रदर्शित झालं आहे. आदिनाथ कोठारेने शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला गुलराज सिंग यांनी साजेसे संगीत दिलं असून हे प्रेरणादायी गाणं शंकर महादेवन यांनी आपल्या दमदार आवाजात गायलं आहे. मराठवाड्यातील हनुमंत केंद्रे या ‘जलदूता’ची कहाणी सांगणाऱ्या या चित्रपटाचं शीर्षकगीत अतिशय स्फूर्तिदायी आहे. या गाण्यातून हनुमंत केंद्रे यांचा पाण्यासाठीचा लढा, संघर्ष आणि त्यांना मिळालेलं यश निदर्शनास येत आहे.

हेही वाचा – Bigg Boss Marathi : कोकण कन्या अंकिता वालावलकरने मुंबईत ‘या’ ठिकाणी केली होती पहिली नोकरी, किती होता पगार? जाणून घ्या…

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या गाण्याचे बोल प्रत्येकाच्या मनाला भिडणारे असून नवीन उमेद देणारेही आहे. गावकऱ्यांच्या सहकार्यानं पाणीटंचाई सारखी भीषण समस्या सोडवून गावकऱ्यांना आशेचा किरण दाखवणारे हे गाणं आहे. अतिशय भावपूर्ण बोल असलेलं हे गाणे संगीतप्रेमींना नक्कीच आवडेल.

या गाण्याबद्दल शंकर महादेवन म्हणतात, “ज्यावेळी या गाण्याबद्दल मला विचारणा करण्यात आली, तेव्हा मी त्वरित होकार दिला. या गाण्याचे बोल मनाच्या खोलवर रुजणारे आहेत. मनातील खंत, संघर्ष, यश, आनंद अशा सगळ्याच भावना या गाण्यातून एकत्र व्यक्त होत आहेत. हे गाणं गाताना माझ्यातही तितकाच उत्साह होता. अतिशय उत्स्फूर्तदायी गाणं आहे. कोणत्याही कठीण परिस्थितीशी लढा देताना हे गाणं प्रत्येकाला प्रेरणा देणारं ठरेल.”

हेही वाचा – प्रसाद ओकच्या ‘त्या’ कृतीमुळे लग्नात रडल्या होत्या सासूबाई, किस्सा सांगत म्हणाला, “आमचं लग्न दुकानात…”

View this post on Instagram

A post shared by We@KothareVision (@kotharevision)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ चित्रपटात आदिनाथ कोठारे, रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट आहे. या चित्रपटाची कथा नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे यांची असून नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॉ. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी ‘पाणी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.