सध्या हिंदीप्रमाणेच मराठी चित्रपटांनाही सुगीचे दिवस आले आहेत. रितेश देशमुखचा ‘वेड’ अन् पाठोपाठ केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. याबरोबरीनेच ‘घर बंदुक बिर्याणी’ अन् ‘वाळवी’सारख्या चित्रपटांनीही सवयीप्रमाणे प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न केला. आता असाच एक आणखी आगळा वेगळा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ज्याचं नाव आहे ‘तीन अडकून सीताराम’.

अभिनेते दिग्दर्शक हृषिकेश जोशी दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट त्याच्या नावामुळे चांगलाच चर्चेत आहे. पाहायला गेलं तर हा एक अत्यंत वेगळ्या धाटणीचा एक धमाल चित्रपट आहे, परंतु चित्रपटाचं हे असं वेगळं आणि हटके नाव प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. हे नाव नेमकं का ठेवलं अन् याचा नेमका अर्थ काय याविषयी खुद्द हृषिकेश जोशी यांनीच खुलासा केला आहे.

आणखी वाचा : प्रभासचा बहुचर्चित ‘सलार’ पुन्हा लांबणीवर; ‘जवान’मुळे प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचा नेटकऱ्यांचा अंदाज

‘झी २४ तास’शी संवाद साधतांना हृषिकेश जोशी म्हणाले, “ही एक पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रचलित म्हण किंवा वाकप्रचार आहे. एखाद्याचा तीन अडकून सीताराम होणे हे मी बऱ्याचदा कोल्हापुरात ऐकलं आहे, किंबहुना मीदेखील या म्हणीचा वापर केला आहे. विचित्र मनोरंजक परिस्थितीत अडकलेल्या माणसासाठी ही म्हण वापरली जाते. जेव्हा कथा लिहून झाली तेव्हा यातील तीनही नायकांची झालेली अवस्था पाहून आपसूकच हे नाव डोक्यात आलं.”

पुढे ते म्हणाले, “या म्हणीविषयी इथे ठाऊक नव्हतं हे मला माहीत नव्हतं. हे माझ्यासाठी आश्चर्यकारक होतं. सगळ्यांना पहिल्यांदा ऐकताक्षणी हे काहीतरी वेगळं असल्याची जाणीव झाली. चित्रपट किंवा त्यातील विनोदनिर्मिती ज्या पद्धतीची आहे त्याचं नावदेखील तसंच असायला हवं. कोल्हापुरातील अनेक प्रेक्षकांनी फार दिवसांनी हा शब्दप्रयोग कानावर पडल्याची प्रतिक्रिया दिली आहे तर काही लोकांनी हे नाव ऐकून अगदीच भुवया उंचावल्या आहेत. अशा विविध प्रतिक्रिया मला पाहायला मिळाल्या आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटात प्राजक्ताबरोबर वैभव तत्तवादी, आलोक राजवाडे हे कलाकारही मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटातील इतरही कलाकारांचे लूक समोर आले आहेत. २९ सप्टेंबरला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.