Jayant Wadkar reveals why her daughter name is Swamini: ज्येष्ठ अभिनेते जयंत वाडकर यांनी ‘हमाल दे धमाल’, ‘आयत्या घरात घरोबा’, ‘धर्मवीर’, ‘फुलवंती’ अशा चित्रपटांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यांच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत.
जयंत वाडकर यांनी नुकतीच ‘लोकशाही फ्रेंडली’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव स्वामिनी का ठेवले, याबद्दल वक्तव्य केले. अभिनेते म्हणाले, “स्वामिनी नाव ठेवण्यापाठीमागे एक कारण आहे. आम्हाला पहिला मुलगा आहे, त्यानंतर ती खूप वर्षांनी वयाच्या ३८-३९ व्या वर्षी गरोदर राहिली. डॉक्टरांनी खूप समस्या आहेत असं सांगितलं.
“माझी पत्नी दर महिन्याला अक्कलकोटला स्वामींच्या…”
“माझी पत्नी दर महिन्याला अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनासाठी जायची. तिला नववा महिना होता. ती म्हणाली की मला जायचंच आहे, आमच्याकडे फियाट ही गाडी होती. त्या गाडीने आम्ही चाललो होतो. सोलापूर आलं आणि मला असं वाटलं की गाडीचा ब्रेक लागत नाहीये. रात्र झाली होती. माझ्या बायकोला गुरुवारच्या त्या शेवटच्या आरतीला जायचं होतं.”
“मी तिला सांगितलं गाडीत काहीतरी बिघाड झाला आहे. ती म्हणाली, काहीतरी कर, पपिंग करून थोडासा ब्रेक लागत होता. मग आम्ही निघालो. आता रस्ता छान झाला आहे. आधी तिथे रस्ताही छोटा होता. तिथे सुखरुप पोहोचलो. गाडी ठेवली. जन्मंजय महाराजांचा मुलगा अमोलला सांगितलं की गाडीत काहीतरी प्रॉब्लेम आहे, तू सकाळी लवकर मेकॅनिकला बोलव आणि बघायला सांग. तो म्हणाला की सांगतो. आम्ही गेलो, दर्शन घेतलं, प्रसाद मिळाला. तिला जे सगळं करायचं होतं ते सगळं केलं. त्यानंतर येऊन आराम केला.”
“सकाळी अभिषेक केला; आम्ही परत निघणार होतो. गाडीविषयी अमोलला विचारलं तर मेकॅनिक तिथेच होता. तो म्हणाला की, तुम्ही एवढे ४२-४५ किलोमीटर आलात तरी कसे? मग परत स्वामींकडे गेलो, ढसाढसा रडलो. गाडीचं पॅडल पूर्णपणे आत गेलं होतं. मी तिथपर्यंत कसा पोहोचलो माहीत नाही, म्हणून आम्ही आमच्या मुलीचं नाव स्वामिनी असं ठेवलं आहे”, असे सांगत स्वामींच्या कृपेची प्रचिती आल्याचे जयंत वाडकर यांनी म्हटले.
दरम्यान, जयंत वाडकर लवकरच ‘येरे येरे पैसा ३’ मध्ये दिसणार आहेत.