Sachin Chandwade : मराठी मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अभिनेता सचिन चांदवडेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २३ ऑक्टोबर रोजी घडली. तो जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात उंदिरखेडे येथे राहणारा होता. सचिन अवघ्या २५ वर्षांचा होता. अभिनेत्याच्या आत्महत्येची बातमी समोर येताच संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
सचिन चांदवडेने राहत्या घरात वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत पंख्याला गळफास घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती खालवल्याने त्याला धुळ्यातील रुग्णालयात शिफ्ट करण्यात आलं होतं. मात्र, २४ ऑक्टोबरला रात्री दीडच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सचिन चांदवडे इंजिनिअर असून तो पुण्यात आयटी पार्कमध्ये नोकरी करत होता. त्याला बालपणापासून अभिनयाची आवड होती आणि यामुळेच त्याने सिनेसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली.
सचिनची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘असुरवन’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार होता. या सिनेमाचं पोस्टर त्याने काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर शेअर केलं होतं. याशिवाय सचिन ‘जमतारा २’ या सीरिजमध्येही झळकला आहे.
गणेशोत्सव, गुढीपाडवा या सणांच्या निमित्ताने सचिनने अनेक प्रसिद्ध मराठी कलाकारांसह ढोलवादन केल्याचे फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आले आहेत. अवघ्या २५ व्या वर्षी त्याने आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मराठी कलाविश्वातील कलाकार, त्याचे चाहते आणि कलाकंद प्रोडक्शन हाऊसने सचिनला भावुक पोस्ट शेअर करत श्रद्धांजली वाहिली आहे.
