मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील सोज्वळ अभिनेत्री अशी त्यांची ओळख होती. सीमा देव यांच्या निधनानंतर सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.

सीमा देव यांच्या निधनानंतर अभिनेत्री अश्विनी भावे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी सीमा देव यांचा एक फोटो शेअर केला आहे. त्याबरोबरच त्यांनी त्यांच्या अभिनयाबद्दलही भाष्य केले आहे.
आणखी वाचा : Seema Deo Passes Away: ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचं निधन, सोज्ज्वळ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड

अश्विनी भावेची पोस्ट

“सीमा ताईंच्या च्या निधनाची बातमी ऐकुन खूप दुःख होत आहे. सीमाताईंचे पडद्यावरचे लोभस रूप आणि त्यांच्या तरल अभिनयाने मी लहान वयातच खूप प्रेरित झाले होते. व्यवसाय आणि कौटुंबिक जबादारी यांचा योग्य समन्वय साधून त्यांनी स्त्री कलाकारांना एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि अजरामर भूमिकांनी लोकांच्या मनावर राज्य केलं. स्त्रीच्या आयुष्यातल्या सर्वच भूमिका त्यांनी समर्थपणे पेलल्या. रमेश काकांवर आणि मुला-नातवंडांवर अपार प्रेम केलं.

सीमा ताई खऱ्या अर्थाने एक परिपूर्ण आयुष्य जगल्या. अजिंक्य, अभिनय आणि कुटुंबीयांना हे अपार दुःख सहन करण्याची ताकद लाभो आणि मृतात्म्यास शांती लाभो अशी मी ईश्वरा कडे प्रार्थना करते. ओम शांती !!”, असे अश्विनी भावे यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : “आमचं सर्व मार्गी लागल्यावर…” सिद्धार्थ चांदेकरने सांगितलं आईचं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाला “तिला कितीही वेळ…”

दरम्यान सीमा देव यांनी ‘आलिया भोगासी’ या चित्रपटातून १९५७ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी पुढे अनेक हिंदी आणि मराठी चित्रपटात काम केलं. ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट विशेष गाजले. ‘आनंद’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१७ मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.