Marathi Actress Megha Ghadge : इंडस्ट्रीमध्ये काम करणं खूपच ग्लॅमरस समजलं जातं. मात्र, प्रत्येक कलाकाराला इथे चांगला अनुभव येईलच असं नाही. अनेक नवोदित कलाकारांना इंडस्ट्रीत काम करताना वाईट प्रसंगाचा सामना करावा लागतो. लोकप्रिय मराठी अभिनेत्री व नृत्यांगना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेघा घाडगेने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.
मेघा घाडगेला मराठी कलाविश्वाची लावणी सम्राज्ञी म्हणून देखील ओळखलं जातं. तिने ‘पछाडलेला’ सिनेमात केलेली ‘रुपानं देखणी’ ही लावणी सर्वत्र आजही लोकप्रिय आहे. याशिवाय ‘नवरा माझा नवसाचा’, ‘चालू द्या तुमचं’ या सिनेमांमध्येही तिने काम केलेलं आहे. मात्र, मेघाचा इंडस्ट्रीमधील प्रवास अजिबात सोपा नव्हता. याबद्दल अभिनेत्रीने ‘आरपार’ या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे.
मेघा सांगते, “मला कॉम्प्रोमाइजचे दोन अनुभव आले. त्यावेळी असं वाटलं हे क्षेत्र आपल्यासाठी नाहीये. आता कुठेतरी थांबलं पाहिजे. मराठी चित्रपट करतानाच हे अनुभव आले आहेत. सगळ्या गोष्टी अप्रत्यक्षपणे होत होत्या, प्रत्यक्ष काहीच विचारलं नव्हतं. मी नावं सांगू शकत नाही…पण, त्यावेळी मी या इंडस्ट्रीत अगदीच नवीन होते. मला समोरच्या माणसाच्या बोलण्यावर मात करता आली असती पण, त्यावेळी ते जमलं नाही. बरं ते माझ्या ओळखीचे नव्हते…तुला असं मोठं काम देतो, त्यातला एक सीन आहे वगैरे असं मला सांगितलं होतं.”
मेघा घाडगे पुढे म्हणाली, “त्यावेळी माझा कोणी मॅनेजर वगैरे सुद्धा नव्हता. त्यामुळे इंडस्ट्रीत आल्यावर मला कोणाचाही पाठिंबा नव्हता, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय असतं हे सुद्धा माहिती नव्हतं. कोणाला जाऊन भेटायचंय, तो समोरचा माणूस चांगला आहे की वाईट काहीच माहिती नव्हतं. कदाचित मला विचारणारा ( कॉम्प्रोमाइज ) समोरचा माणूस इंडस्ट्रीमध्ये सक्रिय सुद्धा नसावा. कारण, त्यानंतर ते लोक मला कुठेच दिसले नव्हते. आज असं वाटतं, मी तिथे बोललं पाहिजे होतं. ते लोक मराठी भाषिकच होते. मी तेव्हा बोलणं गरजेचं होतं. मला दोन कानाखाली सुद्धा देता आल्या असत्या पण, मी दिल्या नाहीत. मला भीती वाटली कारण, मी तेव्हा इंडस्ट्रीमध्ये नवीन होते. बदनामी वगैरे झाली तर काय होईल…याच विचारांची मी सुद्धा होते.”
“मी याबद्दल घरी जाऊन आईला सुद्धा काहीच सांगितलं नाही. चर्चा सुद्धा केली नाही…आज असं वाटतं, ‘मूर्ख होतीस तू मेघा’. मी आज पहिल्यांदा हे सगळं सांगतेय कारण, मला कोणालाच काहीच सांगता आलं नाही.” असं मेघाने सांगितलं.