Marathi Actress : ‘लेक माझी लाडकी’, ‘चंद्र आहे साक्षीला’ यांसारख्या मालिका असो किंवा ‘प्रीतम’, ‘फतेशिकस्त’, ‘सापळा’सारखे सिनेमे, अशा विविधांगी कलाकृतींमधून घराघरांत लोकप्रिय झालेल्या मराठी अभिनेत्रीने नुकताच १२ व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा पुरस्कार पटकावला आहे. ही अभिनेत्री कोण आहे जाणून घेऊयात…
मराठी मालिकांमधून घराघरांत पोहोचलेल्या या अभिनेत्रीचं नाव आहे नक्षत्रा मेढेकर. नुकत्याच पार पडलेल्या १२ व्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवात (२०२२–२३) तिच्या ‘मोग’ या कोकणी चित्रपटासाठी तिला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ हा विशेष ज्युरी पुरस्कार जाहीर झाला आहे.
जोजो डिसुझा दिग्दर्शित, ‘मोग’ सिनेमाद्वारे प्रेम, संघर्ष आणि नात्यांची गोष्ट सांगितली जाते. यात नक्षत्राने साकारलेली सेलिना ही साधी पण भावनिक गुंतागुंतीत सापडलेली व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. मराठी पार्श्वभूमी असूनही नक्षत्रा या भूमिकेसाठी शून्यापासून कोकणी भाषा शिकली. गोव्यातील घराघरांत बोलली जाणारी कोकणी भाषा अभिनेत्रीने हळुहळू आत्मसात केली आणि गोव्यातील स्थानिक उच्चारांवर मेहनत घेतली. नक्षत्राच्या या प्रामाणिक तयारीमुळे तिने साकारलेल्या सेलिनाच्या भूमिकेला वास्तवाचा स्पर्श मिळाला आणि ज्युरींनी तिच्या अभिनयाला विशेष दाद दिली. सेलिना ही भूमिका केवळ नायिकेची नाही, तर संपूर्ण कथानकाचा भावनिक आधारस्तंभ ठरते.
या महोत्सवात ‘मोग’ सिनेमाला एकूण ८ पुरस्कार मिळाले, ज्यात ‘सर्वोत्कृष्ट कोकणी चित्रपट’ या मानाच्या पुरस्काराचा देखील समावेश आहे. गोवा राज्य सरकारतर्फे आयोजित या फेस्टिव्हलचा समारोप पणजीतील कला अकादमी येथे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
अभिनेत्री नक्षत्रा मेढेकरचा प्रवास मालिकांपासून मोठ्या पडद्यापर्यंत येऊन पोहोचला आहे. ‘माझिया माहेरा’मधील पल्लवी, ‘लेक माझी लाडकी’ मधील सानिका, ‘सुर राहू दे’मधील आरोही आणि ‘चंद्र आहे साक्षीला’मधील सुमन काळे या तिने साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिल्या.

पुरस्कार स्वीकारताना नक्षत्रा म्हणाली, “हा सन्मान माझ्यासाठी फक्त पुरस्कार नाही, तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे. ‘मोग’साठी मी भाषा शिकण्यापासून व्यक्तिरेखेचं वास्तव पकडण्यापर्यंत मेहनत घेतली आणि त्या प्रयत्नाची दखल घेतल्याचा मला आनंद आहे. हा पुरस्कार मला जबाबदारीची जाणीव करून देतो. यापुढेही अशाच दर्जेदार, प्रामाणिक आणि प्रेक्षकांच्या मनात ठसतील अशा भूमिका साकारण्याचा प्रयत्न करेन. मग ते टीव्ही असो, वेब सिरीज असो किंवा चित्रपट…मी प्रत्येक माध्यमात काम करण्यासाठी तयार आहे.”