हिंदी सिनेसृष्टीत काम करण्याचं प्रत्येक नवख्या कलाकाराचं स्वप्न असतं. त्यात एखाद्या चित्रपटात जर त्या क्षेत्रातले मातब्बर कलाकार असतील, तर त्यात छोटीशी का होईना… पण काम करण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे शिकायला मिळेल किंवा त्यानिमित्तानं एक वेगळा अनुभव गाठीशी येईल, या हेतूनं अनेक जण त्यात काम करण्यास होकार देतात.
मात्र अनेकदा काही बड्या चित्रपटांत काही कलाकारांना म्हणावं तितकं महत्त्व मिळत नाही. असंच काहीसं झालं होतं एका मराठी अभिनेत्रीबरोबर. ही अभिनेत्री म्हणजे शर्वरी जमेनीस. मनोरंजनसृष्टीत ती एक नृत्यांगना व अभिनेत्री म्हणून सक्रिय आहे. अशातच तिनं ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या हिंदी चित्रपटाच्या सेटवरील एक अनुभव शेअर केला आहे.
त्याबद्दल शर्वरी म्हणाली, “मी एक हिंदी चित्रपट केला, ज्याचे दिग्दर्शक मराठी होते. बिग बजेट आणि मोठी स्टारकास्ट असलेला तो चित्रपट आहे. त्या चित्रपटाच्या निमित्तानं मला शिकायला मिळेल म्हणून मी तो चित्रपट स्वीकारला. त्या चित्रपटाचा सेट गोरेगावच्या फिल्मसिटीत लागला होता. तेव्हा आरे कॉलनीतल्या सेटच्या ठिकाणी आमच्यासाठी फ्लॅट्स बुक करण्यात आले होते. मी त्या चित्रपटाच्या वेळी आठवडाभर एकही सीन न देता बसून होते.”
शर्वरी जमेनीस इन्स्टाग्राम पोस्ट
त्यानंतर ती म्हणाली, “मला रोज सांगितलं जायचं की, उद्या शूटिंग असेल आणि पहाटे ५ वाजताचा कॉल टाइम द्यायचे. पण, त्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी ५ वाजता सांगितलं जायचं की, आजसुद्धा शूटिंग होणार नाही. तेव्हा मुख्य कलाकारांच्या सगळ्या तारख्या वगैरे ठरल्या होत्या. त्यांच्यामुळे असं काही झालं नव्हतं. मग मला माहीत नाही त्यांना वेळेचं योग्य नियोजन करता का आलं नाही.”
नंतर तिनं सांगितलं, “शूटिंगसाठी लागणाऱ्या प्रत्येक दिवसाचे आपल्याला पैसे मिळणार आहेत. मग शूटिंग नाही झालं तरी काय फरक पडणार? आपण आराम करू, असं मला जमत नाही. कारण-खूप वेळ माझ्या नृत्याचा सराव होऊ शकला नाही, तर मला त्याचा खूप त्रास व्हायचा. एखादा मोठा चित्रपट असेल, तर एक-दोन दिवस शूटिंग न होणं समजू शकतो; पण सात दिवस शूटिंग न होणं समजता येणार नाही.”
मग शर्वरी म्हणाली, “मी त्या वातावरणात रमू शकले नाही. मराठीमध्ये असं घडत नाही. प्रत्येकाचे वेगवेगळे युनिट्स होते. महत्त्वाच्या लोकांसाठी वेगळे लोक होते. फराह खान कोरिओग्राफर होत्या. त्यामुळे त्यांच्याबरोबरच्या लोकांसाठी एक सहायक होता, जो त्यांच्यासाठी काम करायचा; पण मधले जे काही कलाकार होते, त्यांना विचारणारे कोणी नव्हते. कदाचित महत्त्वाच्या लोकांपर्यंत याबद्दलच्या काही गोष्टी पोहोचल्याही नसतील.”