Smita Shewale Talk About Her Role In Abhang Tukaram : गेल्या काही दिवसांत मराठी कलाविश्वात अनेक चरित्रपट आले. ऐतिहासिक आणि महापुरुषांच्या आयुष्यावर आलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांनीही चांगलाच प्रतिसाद दिला आहे. काही संतपटांनाही प्रेक्षकांनी आपली पसंती दर्शवली आहे. अशातच आता संत तुकाराम महाराजांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, याचं नाव आहे ‘अभंग तुकाराम.’

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘अभंग तुकाराम’ हा सिनेमा येत्या ९ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात अभिनेते योगेश सोमण यांनी संत तुकाराम महाराज यांची भूमिका साकारली आहे, तर अभिनेत्री स्मिता शेवाळे तुकारामांची पत्नी आवली ही भूमिका साकारत आहे. स्मितानं तिच्या याच आवली ही भूमिका करतानाचा अनुभव शेअर केला आहे.

लोकसत्ता डिजिटल अड्डाला दिलेल्या मुलाखतीत स्मितानं ‘अभंग तुकाराम’ सिनेमात आवलीची भूमिका करण्याआधी विठ्ठलाची माफी मागितली होती असं म्हटलं आहे. याबद्दल स्मिता म्हणाली, “मी आस्तिक आहे, माझी देवावर पूर्ण श्रद्धा आहे, आम्ही ‘मुक्ताई’ सिनेमाच्यावेळी पंढरपूरला दर्शनासाठी गेलो होतो, तेव्हा मला माहीत होतं की माझा पुढचा सिनेमा हा ‘अभंग तुकाराम’ आहे आणि मी त्यात आवली ही भूमिका करणार आहे; तर मी तेव्हाच विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि माफी मागत विठुरायाला सांगितलेलं की, ‘मी तुला बोलणार आहे हा… भूमिकेच्या माध्यमातूनच बोलणार आहे; पण मी बोलणार आहे.’ कारण या सिनेमात विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभं राहून ते एक स्वगत बोलणं हे खूप मोठं आवाहनच होतं.”

यानंतर स्मितानं सांगितलं की, “मला वाटतं, जेव्हा आपली देवावर खूप श्रद्धा असते तेव्हा त्याच देवाबद्दल बोलणं कठीण जातं. माझे आजी-आजोबा वारकरी होते. त्यांनी अगदी शेवटपर्यंत वारी केली, त्यामुळे लहानपणापासूनच घरात हे वातावरण आहे. त्यामुळे ही भूमिका करणं माझ्यासाठी अभिनयाचा भाग असला तरी मला सुरुवातीला ते करणं कठीण वाटत होतं. आवली ही भूमिका समजून घेताना खूप वेगवेगळ्या गोष्टी लक्षात आल्या. तिचा राग, तिची तगमग, ती का बोल लावत आहे? तिला कसला त्रास आहे? तेच सगळं या सिनेमातून सर्वांना पाहायला मिळणार आहे. ती एक संतपत्नी असली तरी तिचं एक म्हणणं होतं. दिग्दर्शकाला ज्या पद्धतीनं या सिनेमात आवलीची भूमिका हवी होती, तशीच भूमिका करणं यासाठी प्रयत्न केले आहेत.”

स्मिता शेवाळे इन्स्टाग्राम पोस्ट

दरम्यान, योगेश सोमण आणि स्मिता शेवाळे यांच्यासह ‘अभंग तुकाराम’मध्ये मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, अजय पुरकर, विराजस कुलकर्णी, अभिजित श्वेतचन्द्र, अजिंक्य राऊत, निखिल राऊत, नुपूर दैठणकर, तेजस बर्वेसह काही इतर कलाकारांच्याही मुख्य भूमिका आहेत.