Ye Re Ye Re Paisa 3 Marathi Movie : मराठी सिनेविश्वात सध्या ‘येरे येरे पैसा ३’ या सिनेमाची जोरदार चर्चा सुरू आहे. संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा’ फ्रँचायझीचा हा तिसरा भाग आहे. १८ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या ग्रँड प्रिमियरला मराठी सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. याशिवाय प्रेक्षकांचा देखील या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
सिनेमा प्रदर्शित झाल्यापासून मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी ‘येरे येरे पैसा ३’साठी खास पोस्ट शेअर करत, या चित्रपटाचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं. कुशल बद्रिके, हेमांगी कवी, स्वप्नील जोशी यांनी लाडक्या मित्रांचा सिनेमा जरूर पाहावा असं आवाहन प्रेक्षकांना केलं होतं. आता याच संदर्भात लोकप्रिय अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी खास पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी नुकताच ‘येरे येरे पैसा ३’ हा सिनेमा पाहिला. हा चित्रपट पाहिल्यावर ते काय म्हणाले जाणून घेऊयात…
काय म्हणाले प्रवीण तरडे?
प्रवीण तरडे लिहितात, “मराठीत पण व्यावसायिक सिनेमा बनू शकतो…संजय जाधव म्हणजे दोस्तांच्या दुनियादारीतील मूळ पुरूष त्याचा सिनेमा नेहमीच उत्सुकतेचा विषय असतो… ‘येरे येरे पैसा – ३’ हा अत्यंत वेगवान पटकथा असलेला सिनेमा, खतरनाक दिग्दर्शनातून साकारलाय… भव्यतेच्या बाबतीत सुधीर कोलते, ओमकार माने, अमेय खोपकर आणि इतर निर्मात्यांनी मराठी सिनेमाला निर्मितीच्या क्षेत्रात दोन पावलं पुढं नेलंय… अभिनयाची मांदियाळीही कमाल जमून आलीये… सिध्दार्थ जाधव आणि उमेश कामत दोघं अभिनयाच्या ताकदीवर सिनेमात भाव खावून जातात.. संजय नार्वेकर आणि तेजस्विनी पंडित सलग तीन भागात तशीच अप्रतिम बॅटिंग करताहेत… नागेश भोसले, जयवंत वाडकर, वनिता खरात, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे तुम्ही सगळे कमाल आहात आणि शेवटी शेवटी आलेला ईशान खोपकर तुझी एनर्जी जबरदस्त आहे.. संजय जाधव आणि टीमला खूप शुभेच्छा! नक्की बघा ‘येरे येरे पैसा – ३’.”
दरम्यान, ‘येरे येरे पैसा’ चित्रपटाचा पहिला भाग २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर २०१९ मध्ये या चित्रपटाचा दुसरा भाग प्रदर्शित झाला होता. आता जवळपास ६ वर्षांनी या सिनेमाचा तिसरा भाग १८ जुलैला प्रदर्शित झाला आहे.