Digpal Lanjekar Talk About Chhaava Movie Lezeem Dance : २०२५ मधील बॉलीवूडच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे विकी कौशलचा ‘छावा’ हा सिनेमा. सिनेमाच्या प्रदर्शनाच्या आधीपासूनच अनेकांना उत्सुकता लागून राहिली होती. मात्र, ट्रेलर प्रदर्शित होताच हा सिनेमा एका वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. सिनेमाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळतानाचे दृश्य पाहायला मिळाले होते. त्यावरून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या गेल्या. नंतर सिनेमामधून हे दृश्य वगळण्यात आलं.
‘छावा’मधील छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळतानाच्या दृश्यावर काहींनी टीका केली होती. आनंदोत्सव करीत असताना सिनेमॅटिक लिबर्टी घेणं कितपत योग्य आहे, असा प्रश्न विचारला गेला होता. अशातच आता यावर मराठी दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. लवकरच त्यांचा ‘अभंग तुकाराम’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने मराठी मनोरंजन विश्वशी साधलेल्या संवादात त्यांनी ‘छावा’मधील लेझीम दृश्यावर मत व्यक्त केले.
दिग्पाल लांजेकर म्हणाले, ‘आपण त्या काळाचं भान ठेवलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही आपली दैवतं आहेत. आज एखाद्या नगरसेवकाच्या कार्यालयात गेलात तरी त्यांचे कार्यकर्ते बाहेर बसायला सांगतात किंवा एखाद्या मंत्र्याच्या कार्यक्रमातही त्याच्याबरोबर बसलेलो असताना माझी खुर्ची मागे घेतली जाते. हे जर आज पाळलं जात असलं, तर ते तेव्हाही पाळलं जात असणार आणि त्याचं भान ठेवणं गरजेचं आहे.”
ऐतिहासिक सिनेमे करताना कलात्मक स्वातंत्र्य घ्यावं लागतं : दिग्पाल लांजेकर
पुढे ते सांगतात, “छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळले नसतील का? तर नक्कीच खेळले असतील. कारण- तो महाराष्ट्राचा मैदानी खेळ आहे; पण तो खेळ खेळत असताना प्रसंग कुठला आहे? त्याचं तारतम्य काय आहे? याचा विचार केला गेला पाहिजे, असं मला वाटतं. ऐतिहासिक गोष्टींविषयी आपल्या लोकांनी खूप कमी लिहून ठेवलं आहे आणि त्यामुळे ऐतिहासिक सिनेमे करताना अनेक अडचणी येतात. मी फिल्म मेकरची ही अडचण समजू शकतो. अनेक ठिकाणी इतिहास मुका होतो. त्यामुळे ते कसं घडलं हे कळत नाही. त्यामुळे तत्कालीन परिस्थितीशी काही संबंधित बिंदू सापडतात आणि हे बिंदू जोडताना लॉजिक वापरावं लागतं. कलात्मक स्वातंत्र्य घ्यावं लागतं. एवढीच लिबर्टी असावी, मग असे वाद उदभवत नाहीत. मी सात सिनेमे केलेत आणि एकाही सिनेमाबाबत वाद उदभवलेला नाही. कारण- हे सगळे सिनेमे श्रद्धेने केले आहेत.”
पुढे दिग्पाल लांजेकरांनी लेझीम दृश्याबद्दल म्हटलं, “जे नृत्य वगळलं गेलं. त्याबद्दल माझं स्पष्ट मत आहे की, थोडासा इतिहासाचा अभ्यास कमी पडला की काय? मी ‘छावा’च्या फिल्म मेकरप्रति अत्यंत आदरानं हे नमूद करू इच्छितो. सहा महिन्यांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं होतं. वडील हरवल्यानंतर कोणीही मावळा किंवा सरदारानं कितीही आग्रह केला तरी वडिलांना दैवत मानणारा राजपुत्र नृत्य करील का? हा लॉजिकचा भाग आहे.”
पुढे ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा मोठा सोहळा झाला होता, तो छत्रपती संभाजी महाराजांचा नाही झाला. कारण- त्यावेळी स्वराज्याच्या आजूबाजूची परिस्थिती वेगळी होती. महाराजांचं निर्वाण झालं होतं. त्यामुळे त्यांचे सगळे शत्रू स्वराज्यावर तुटून पडले होते. त्यावेळी राजा होऊ पाहणारा त्या सोहळ्यात रमणार नाही. राज्याभिषेक सोहळा करणं गरजेचं होतं. कारण- त्या माध्यमातून जनतेला त्याबाबत माहिती देणं गरजेचं होतं. त्यामुळे सोहळा महत्त्वाचा होता; पण आजूबाजूची परिस्थिती लक्षात घेता, तो सोहळा त्यांनी साधेपणानं केला आणि त्यातूनच छत्रपती संभाजी महाराजांचा जाणतेपणा दिसून येतो. त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं, असं वाटत नाही का? हा तारतम्याचा भाग आहे. त्यासाठी अभ्यास महत्त्वाचा आहे. आजूबाजुच्या परिस्थितीचं भान हवं. म्हणून लिबर्टी घेताना तत्कालीन जीवनशैली, लोकशैली, चालीरीती रूढी-परंपरा या बाबी महत्त्वाच्या आहेत.”
