Milind Gawali on Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे योगदान असणारे अशोक सराफ आजही विविध भूमिका साकारताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच ते लोकेश गुप्ते दिग्दर्शित ‘अशी ही जमवा जमवी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. सध्या ते कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मा. मा.’ या मालिकेत काम करताना दिसत आहेत.
अशोक सराफ यांनी आजवर अनेक कलाकारांबरोबर काम केले आहे. त्यामध्ये शाहरुख खान, सलमान खान यांचाही समावेश आहे. त्यांनी नायक आणि काही खलनायकाच्या भूमिकादेखील साकारल्या. मात्र, लोकांना खळखळून हसवणाऱ्या भूमिकांमुळे त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली.
अनेक कलाकार अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगतात. आता लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळींनी अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला आहे.
मिलिंद गवळी काय म्हणाले?
मिलिंद गवळींनी काही दिवसांपूर्वीच ‘टेली गप्पा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी अशोक सराफ यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव, त्यांच्याकडून काय शिकायला मिळाले, याबाबत वक्तव्य केले. मिलिंद गवळी अशोक सराफ यांच्याबाबत नेमके काय म्हणालेत, हे जाणून घेऊ…
मिलिंद गवळी म्हणाले, “अशोक मामांसारखा प्रामाणिक कलाकार मी बघितला नाही. अनेक उत्तम कलाकारांबरोबर मी कामं केली. कालांतराने ते कलाकार थकले. अशोक मामा मला एकदा म्हणालेले की, मला ज्या दिवशी सकाळी उठल्यानंतर शूटिंगला जायला कंटाळा येईल, त्या दिवशी मी निवृत्त होईल. ते अजून निवृत्त झाले नाहीत, त्याचं कारण त्यांचं कामाप्रतिचं समर्पण तसेच आहे. तो माणूस सेटवर कधीही उशिरा आला, असं मी कधीही पाहिलं नाही. मी त्यांच्याबरोबर सात सिनेमांमध्ये काम केलं हे मी माझं भाग्य समजतो. कदाचित मी त्यांच्याबरोबर इतके सिनेमे केल्यामुळे मला बऱ्याचशा गोष्टी आत्मसात करता आल्या.
अभिनेते पुढे म्हणाले, “मी दरवेळी सांगतो की, खोटी मिशी कशी लावायची असते, याचं कोणीही ट्रेनिंग देत नाही. मी निलांबरी या चित्रपटात काम केलं होतं आणि मी खोटी मिशी लावली होती. मी नवीनच होतो, तरी ती खोटी मिशी मला नीट लावता आली नव्हती. तर, सून लाडकी सासरची या चित्रपटाच्या वेळी मी अशोक मामांना बघायचो. ते आले की, ते खोटी मिशी लावायचे. पण, ते मिशी अशा प्रकारे लावायचे की, त्यांची ती मिशी खोटी आहे, हे दिवसभर कोणाला कळायचं नाही.”
“पॅकअपनंतर ते खोटी मिशी काढायचे. त्यानंतर मी ‘परिवर्तन’ नावाची मालिका केली. त्या वेळेला मी त्यांच्या स्टाईलने मिशी लावायचो. मी त्या मालिकेचे ५२ एपिसोड केले. लोक मला म्हणायचे की, ही मिशी खरी आहे का? कोणाला कळायचंच नाही की, ती मिशी खोटी आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी मी त्यांच्याकडून शिकलो.
मिलिंद गवळी व अशोक सराफ यांनी ‘सून लाडकी सासरची’, ‘मोस्ट वॉन्टेड’, ‘सख्खा भाऊ पक्का वैरी’, ‘भक्ती हीच खरी शक्ती’ अशा चित्रपटांत एकत्र काम केले आहे.
दरम्यान, सध्या मिलिंद गवळी हे ‘मनपसंद की शादी’ या मालिकेत काम करताना दिसत आहेत.