लोकप्रिय अभिनेत्री मिथिला पालकरच्या आजीचं निधन झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. मिथिलानं स्वत: याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत भावना व्यक्त केल्या आहेत. अभिनेत्री इन्स्टाग्रामवर तिच्या आजीबरोबरचे फोटो शेअर करीत लिहिते, “मला जग समजायला आता वेळ लागेल. कारण- तिच्याशिवाय हे जग मी कधी पाहिलंच नाही.” मिथिलानं शेअर केलेल्या भावूक पोस्टवर अभिनेता सुव्रत जोशीने कमेंट करीत “भावपूर्ण श्रद्धांजली… काळजी घे”, असं म्हटलं आहे.
मिथिलाच्या आयुष्यात आजीचं महत्त्व खूप जास्त होतं. अभिनेत्री बालपणापासून तिच्या आजी-आजोबांबरोबर मुंबईच्या दादर परिसरात राहते. याच ठिकाणी तिचं बालपण गेलं. मिथिलाचं तिच्या आजी-आजोबांबरोबर घट्ट नातं होतं. २०२२ मध्ये तिच्या आजोबांनी या जगाचा निरोप घेतला. त्यावेळीसुद्धा अभिनेत्रीने तिच्या आजोबांसाठी पोस्ट करीत त्यांच्याबरोबरच्या आठवणी शेअर केल्या होत्या. अशातच आता मिथिलाच्या आजीचंही निधन झालं असल्यानं अभिनेत्री सध्या कठीण काळातून जात आहे.
दरम्यान, मिथिला पालकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून, मराठीसह तिनं हिंदीतही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनेत्रीनं चित्रपटांसह वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. ती तिच्या ‘मुरांबा,’ ‘लिटिल थिंग्ज’ या कलाकृतींसाठी ओळखली जाते. आजवर तिनं ‘कारवान’, ‘चॉपस्टिक्स’, ‘त्रिभंगा’, ‘गर्ल इन द सिटी’, ‘कट्टी बट्टी’, मुरांबा यांसारख्या कलाकृतींमध्ये काम करीत इंडस्ट्रीमध्ये स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.