Mukta Barve Emotional Reaction : नुकत्याच पार पडलेल्या ६० आणि ६१ वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेला चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. याबद्दल अभिनेत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यावेळी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मुक्ता बर्वे म्हणाली, “मला खूप छान वाटत आहे. कारण हा विशेष योगदान पुरस्कार आहे आणि चित्रपती व्ही. शांताराम यांच्या नावाने या विशेष हा पुरस्कार दिला जातो. महाराष्ट्र शासनाने पदार्पणापासूनच माझं कौतुक केलं आहे. माझ्या ‘चकवा’ नावाच्या सिनेमासाठी मला पदार्पणाचं पारितोषिक मिळालं होतं. त्यानंतर जवळपास पंचवीस वर्षांनी माझ्या आजवरच्या कामाचं कौतुक होत आहे. त्यामुळे आता एका विशिष्ट टप्प्यावर मी येऊन पोहोचले आहे आणि या टप्प्यावर महाराष्ट्राने माझं कौतुक केलं आहे; याचा आनंद होतो.”

माझे प्रेक्षकही या पुरस्काराचे मानकरी आहेत : मुक्ता बर्वे

यापुढे अभिनेत्री म्हणते, “माझ्यावर विश्वास ठेवणारे सगळे लेखक, दिग्दर्शक, निर्माते, सहकलाकार आणि अर्थात ज्यांच्याशिवाय कोणताच कलाकार पूर्ण होत नाही, असे प्रेक्षकही या सगळ्यात सहभागी आहेत. त्यामुळे हा पुरस्कार घेताना मला विशेष आनंद होतोय की, माझ्या सगळ्या भूमिकांबरोबर माझे प्रेक्षकही या पुरस्काराचे मानकरी आहेत. माझ्यासाठी हा प्रसंग खूपच खास आहे. यामुळे मी भारावून गेले आहे. मी कृतज्ञ आहे. मराठी सिनेमाची परंपरा इतकी मोठी आहे.

‘या’ पुरस्कारासाठी निवडलं, याचा मला अभिमान : मुक्ता बर्वे

पुढे मुक्ता बर्वे म्हणते, “महाराष्ट्र राज्याच्या पुरस्काराची ट्रॉफी आहे; जिला आम्ही बाहुली म्हणतो. ती जवळ घेण्यासाठी जीव तळमळतो. ती इतकी सुंदर आहे आणि तो पुरस्कारही अत्यंत मानाचा आहे. त्यामुळे मला असं वाटतं नाही की, याची तुलना कोणत्या वेगळ्या भाषेच्या पुरस्काराशी केली पाहिजे. माझ्या माणसांनी, माझ्या मातीतल्या कामासाठी केलेलं कौतुक माझ्यासाठी कायमच खूप मोठं असेल. राज्य शासनाने मला या पुरस्कारासाठी निवडलं, याचा मला अभिमान आहे.”

यानंतर मुक्ताने पुरस्कार जाहीर झाल्याचं कळताच पहिली प्रतिक्रिया काय होती? याबद्दल असं म्हटलं की, “मला पुरस्कार जाहीर झाला; तेव्हा मला एक फोन आला होता. तेव्हा मी त्यांना हा पुरस्कार नक्की कशासाठी आहे असं विचारलं होतं. त्यावर मला सांगण्यात आलं की, मी केलेली कामं, त्यांची निवड, याशिवाय त्यांनी काही विशेष कौतुकास्पद गोष्टी सांगितल्या. त्यावर मला अत्यंत आनंद वाटला की, याची कोणी तरी दखल घेत आहे. आपली कामाची निवड, तळमळ याचं कौतुक होत असल्यामुळे मला आनंद होत आहे. माझं नशीबही चांगलं आहे; कारण मराठीत इतके चांगले कलाकार आहेत. असं नाही की मी सर्वोत्तम आहे; पण माझं कायम कौतुक होत आलं आहे.”

यानंतर मुक्ताने तिच्या आगामी कामाबद्दल म्हटलं की, “मी बऱ्याच ठिकाणी दिसत नाही. पण निवडणारा शोधून शोधून माझं काम निवडतो आणि त्याचं फळ मला मिळतं. या वर्षांत आणखी काही महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत; ज्यावर माझं काम सुरू आहे. प्रदर्शित झालेल्या सिनेमांचं हे कौतुक आहे. याशिवाय माझे अजून प्रदर्शित होणारे तीन सिनेमे आहेत.”