Marathi Actress Namrata Sambherao : आपल्या हरहुन्नरी अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री म्हणून नम्रता संभेरावला ओळखलं जातं. मराठी नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही माध्यमांमध्ये अभिनेत्रीने आपला ठसा उमटवला आहे. गेली अनेक वर्षे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या विनोदी कार्यक्रमातून नम्रता रसिक प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे.

वैयक्तिक आयुष्यात नम्रताने २०१३ मध्ये योगेश संभेराव यांच्याशी लग्नगाठ बांधली. दोघेही एकत्र कॉलेजमध्ये होते, त्यानंतर सोशल मीडियामुळे या दोघांची मैत्री आणखी घट्ट झाली. पुढे, या मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन या दोघांनी लग्न केलं. नम्रता संभेरावच्या मुलाचं नाव रुद्राज असं आहे. आज लग्नाच्या १२ व्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत नम्रताने पती योगेश यांचं कौतुक केलं आहे.

नम्रता गेली अनेक वर्षे घर-संसार सांभाळून अभिनय क्षेत्रातही उत्तम कामगिरी करत आहे. या प्रवासात अभिनेत्रीला तिच्या नवऱ्यासह सासरच्यांनी खूप मोठा पाठिंबा दिल्याचं तिने अनेक मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे पतीला लग्नाच्या वाढदिसाच्या शुभेच्छा देताना नम्रताने त्यांचा उल्लेख ‘माझा सगळ्यात मोठा आधार’ असा केला आहे.

नम्रता लिहिते, “लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा योगेश. माझा सगळ्यात मोठा आधार… रुद्राजचा लाडका बाबा. गेल्या १२ वर्षात घडलेल्या प्रत्येक चांगल्या वाईट क्षणात तू माझ्याबरोबर आहेस. हसत-खेळत, भांडत, एकमेकांना सांभाळत, प्रेम करत आपण एक साधं सरळ आयुष्य जगतोय… एकमेकांना जपतोय… आयुष्यभर अशीच साथ, तुझी सोबत हवी आहे… आपल्यातली मैत्री आणि प्रेम अधिकाधिक बहरत जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना… मी जशी आहे तसं मला सहन करणाऱ्या माझ्या नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.”

View this post on Instagram

A post shared by Namrata Yogesh Sambherao (@namrata_rudraaj)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नम्रताने या पोस्टसह पती अन् लेकाबरोबरचा फॅमिली फोटो शेअर केला आहे. अभिनेत्रीच्या पोस्टवर खुशबू तावडे, केतकी पालव, काजल काटे यांसासारख्या अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. याशिवाय नेटकऱ्यांनी सुद्धा या जोडप्याचं कौतुक केलं आहे.