Namrata Sambherao Wins Filmfare Awards : ‘फिल्मफेअर मराठी २०२५’ हा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला मराठीसह बॉलीवूडचे काही सेलिब्रिटी देखील उपस्थित राहिले होते. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यात आदिनाथ कोठारे दिग्दर्शित ‘पाणी’ चित्रपटाने बाजी मारल्याचं पाहायला मिळालं. तर, प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ सिनेमाला देखील अनेक पुरस्कार मिळाले.
याशिवाय यंदाचा ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री’चा फिल्मफेअर पुरस्कार नम्रता संभेरावला ‘नाच गं घुमा’ या सिनेमासाठी प्रदान करण्यात आला. नम्रताला यंदा ‘नाच गं घुमा’ चित्रपटातील भूमिकेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र, आयुष्यात पहिल्यांदाच फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यावर अभिनेत्री भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. नम्रताने इन्स्टाग्रामवर सुंदर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘फिल्मफेअर’ पुरस्कार सोहळ्यात नम्रताचं ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्री’ म्हणून नाव जाहीर करताच तिच्या मैत्रिणी… अभिनेत्री प्राजक्ता माळी व सई ताम्हणकर या दोघींनी एकच जल्लोष केला. तसेच वंदना गुप्ते यांच्या हस्ते नम्रता ट्रॉफी स्वीकारत असल्याचा सुंदर क्षण सई आणि प्राजक्ताने फोनमध्ये शूट केला. नम्रता बक्षीस घ्यायला जाईपर्यंत या दोघीजणी तिला भरभरून प्रोत्साहन देत असल्याचं अभिनेत्रीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.
नम्रता संभेराव प्राजक्ता माळी आणि सई ताम्हणकरला टॅग करत लिहिते, “तुम्हा दोघींना माझ्याकडून खूप खूप प्रेम, तुम्ही माझ्या स्वीटहार्ट्स आहात, माय गर्ल्स थँक्यू… हा सुंदर क्षण तुम्ही शूट करून ठेवलात. सई… तुझा चिअर करतानाचा आवाज अजूनही मला ऐकू येतोय थँक्यू सो मच!”
नम्रता संभेरावची पोस्ट
अविस्मरणीय क्षण
ही Black Lady, ही फिल्मफेअरची ट्रॉफी हातात घेताना सरसरून काटा आला अंगावर… कंठ दाटून आला जेव्हा शेकडो नजरा माझ्याकडे होत्या. उर भरून आला जेव्हा सगळ्या माझ्या माणसांच्या डोळ्यात मी माझ्यासाठीचं, माझ्या कामासाठीचं अतोनात प्रेम पाहिलं. त्यांच्या टाळ्या आणि तो जल्लोष अजूनही कानात घुमतोय. निःशब्द झाले जेव्हा समोर Bollywood ची मोठी अभिनेत्री तब्बू या माझ्यासमोर बसल्या होत्या. स्वप्न होतात हो पूर्ण… माझ्या या प्रवासात एक-एक पाऊल पुढे टाकताना मी जी स्वप्न पाहते किंवा पाहिली होती ती पूर्ण होत आहेत. मेहनत जिद्द प्रचंड आहे पण ही मेहनत आनंददायी आहे. माझ्या ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या संपूर्ण समुहाचे मनापासून आभार…मुक्ता बर्वे ताईचे विशेष आभार…मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी सर, स्वप्नील जोशी दादा, शर्मिष्ठा राऊत, फिल्मफेअर आणि सर्व परीक्षकांचे खूप आभार ज्यांनी मला हा सन्मान मिळवून दिला…This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, नम्रता संभेरावच्या पोस्टवर शर्मिला शिंदे, प्रसाद खांडेकर, समीर चौघुले, खुशबू तावडे, अश्विनी कासार, योगिता चव्हाण, सुयश टिळक, अभिजीत खांडकेकर या कलाकारांनी कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे.