अभिनेत्री तेजस्विनी पंडित मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमधून काम करीत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तर आता तिने अभिनयासह निर्मिती क्षेत्रातह पाऊल ठेवलं आहे. तेजस्विनी पंडितचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त अनेकांनी सोशल मीडियामार्फत तिला शुभेच्छा देत तिचे काही फोटोज व व्हिडीओ शेअर केले आहेत. अशातच अभिनेत्री नम्रता संभेरावनेही तेजस्विनीसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे.
नम्रताने तेजस्विनीच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर पोस्ट केली असून, त्यामध्ये तिने तेजस्विनीबरोबरचे काही खास फोटो शेअर केले आहेत. यावेळी नम्रताने या फोटोंना खास कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले आहे, “तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! माझी लाडकी जवळची मैत्रीण. जगातली सगळी सुखं तुझ्या पदरात पडो हीच प्रार्थना! माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.”
तेजस्विनीचा खास मित्र सिद्धार्थ जाधवनेही तिच्या वाढदिवसानिमित्त इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. सिद्धार्थने तेजस्विनीबरोबरचे खास फोटो शेअर केले आहेत. त्याने या फोटोंना ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा बंड्या, आयुष्यात अशीच मॅड राहा, खूप प्रेम’ अशी कॅप्शनही दिली आहे. नम्रता, सिद्धार्थसह इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी तेजस्विनीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नम्रता व तेजस्विनी यांच्या मैत्रीबद्दल बोलायचं झालं, तर नम्रता व तेजस्विनीनं ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. या चित्रपटामुळे त्यांच्यामध्ये घट्ट मैत्री झाली. तर प्रसाद खांडेकर दिग्दर्शित हा चित्रपट ८ डिसेंबर २०२३ ला प्रदर्शित झाला होता. त्यामध्ये तेजस्विनी व नम्रता महत्त्वाच्या भूमिकेत होत्या. त्यांनी एकत्र काम केलेला हा पहिलाच चित्रपट. नम्रता व तेजस्विनीसह यामध्ये प्रसाद खांडेकर, सयाजी शिंदे, गिरीश कुलकर्णी, वनिता खरात, ओंकार भोजने यांसारखे कलाकार झळकले होते. पण, या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर विशेष कमाई केली नाही.
दरम्यान, तेजस्विनीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ‘मी सिंधुताई सपकाळ,’ ‘तू ही रे’, ‘ये रे ये रे पैसा’ ‘देवा एक अतरंगी’, ‘तिचा उंबरठा’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तेजस्विनीचा ‘तू ही रे’ हा चित्रपट त्या काळी चांगलाच गाजला होता. त्यामुळे आजही लोक तिला ‘तू ही रे’साठी ओळखतात. तर नुकताच तेजस्विनी पंंडितची निर्मिती असलेला ‘येक नंबर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.