शेतकरी संघटना महिन्याभरापासून किमान आधारभूत किंमत म्हणजेच हमीभावासाठी कायदा करावा या मुख्य मागणीसह इतर काही मागण्यांसाठी दिल्लीजवळच्या शंभू आणि खनौरी सीमेवर ठाण मांडून बसलेल्या आहेत. आता या शेतकरी आंदोलनाबाबत सरकारने घेतलेल्या भूमिकेवर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शेतकरी संमेलनात आपलं मत मांडलं आहे.
नाना पाटेकर यांनी नाशिकमध्ये आयोजित शेतकरी साहित्य संमेलनात उपस्थिती लावली होती. याचं उद्घाटन नानांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन व सध्या सुरू असलेल्या राजकीय घडामोडींबाबत प्रतिक्रिया दिली.
नाना पाटेकर म्हणाले, “सरकारकडे मागू नका, कोणतं सरकार आणायचं हे ठरवा. मला राजकारणामध्ये जाता येत नाही कारण, माझ्या जे पोटात असतं तेच ओठात येतं. राजकारणात गेलो तर दुसऱ्या दिवशी मला त्या पक्षातून काढतील.”
हेही वाचा : ओले काजूगर, सुंदर निसर्ग अन्…; प्रथमेश लघाटे पोहोचला आजोळी, शेअर केले कोकणातील सुंदर फोटो
“तुम्ही आमच्या नवीन पिढीसमोर काय आदर्श ठेवणार? रोज आपल्याला अन्न देणाऱ्याची जर तुम्हाला किंमत नसेल, तर मग आम्ही तुमची किंमत का ठेवायची?” असा सवाल नाना पाटेकर यांनी या शेतकरी संमेलनात उपस्थित केला आहे.
नाना पुढे म्हणाले, “जरी मी आत्महत्या केली तरी पुढचा जन्म शेतकरी म्हणून घेईन. पुढचा जन्म मला शेतकरी म्हणून नको असा कोणताच बळीराजा बोलणार नाही. आपण जनावरांची भाषा ओळखतो, तर तुम्हाला शेतकऱ्यांची भाषा त्यांचे प्रश्न का समजत नाही.” दरम्यान, नानांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘ओले आले’ या मराठी चित्रपटात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. यामध्ये त्यांच्याबरोबर मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ चांदेकर व सायली संजीव यांनी स्क्रिन शेअर केली आहे.