अलीकडच्या काळात अनेक मराठी कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहतात. Daily Vlogs शेअर करणं, चाहत्यांबरोबर ‘आस्क मी सेशन’मध्ये सहभागी होणं आणि त्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं देणं, इन्स्टा लाइव्हद्वारे संवाद साधणं असे विविध उपक्रम अनेक सेलिब्रिटी करतात. मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनीचा ‘आस्क गॅश’ सेगमेंट सुद्धा चाहत्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे.

गश्मीर महाजनी या सेगमेंटद्वारे, त्याचे आगामी चित्रपट, त्याच्या आवडतीच्या वस्तू, त्याला कोणते सिनेमे आवडलेत, याशिवाय अभिनेता सध्या कोणती पुस्तकं वाचतोय आणि आपल्या भावी पिढीने कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चाहत्यांना देतो. गश्मीरच्या ‘आस्क मी सेशन’मध्ये त्याला विविध प्रश्न विचारले जातात. याशिवाय अभिनेत्याला त्याच्या चाहत्यांबरोबर कोणत्याही फिल्टरशिवाय थेट संवाद साधता येतो.

नुकत्याच घेतलेल्या ‘आस्क मी सेशन’मध्ये गश्मीरला एका नेटकऱ्याने, “तू प्राजक्ता माळीला इन्स्टाग्रामवर फॉलो का करत नाहीस? तुम्ही दोघांनी एकत्र सिनेमा सुद्धा केला आहे.” असा प्रश्न विचारला गेला.

यावर अभिनेत्याने हटके उत्तर दिलं आहे. तो म्हणतो, “प्राजक्ता प्लीज त्यांना सांग…तुला फॉलो का करत नाही” याशिवाय या पोस्टमध्ये गश्मीरने प्राजक्ताला टॅग सुद्धा केलं आहे.

gashmeer
गश्मीर महाजनी इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, गश्मीर महाजनी व प्राजक्ता माळी यांनी २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘फुलवंती’ या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांना, ऑनस्क्रीन जोडीला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. दोघांच्या भूमिका सर्वत्र लोकप्रिय ठरल्या. याशिवाय बॉक्स ऑफिसवर सुद्धा या सिनेमाने चांगला गल्ला जमावला होता.