Dashavatar Movie : दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेला ‘दशावतार’ सिनेमा १२ सप्टेंबरला संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आहे. कोकणाला लाभलेली निसर्गाची देणगी, त्यावर होणारं अतिक्रमण, कोकणी परंपरा आणि बाबुली मिस्त्रीच्या आयुष्यातील शेवटचा ‘दशावतार’ त्याच्या आयुष्याला कोणतं नवीन वळण देणार यावर या सिनेमाचं कथानक आधारित आहे.
प्रसिद्ध गीतकार गुरू ठाकूर यांनी लिहिलेली ‘दशावतार’ सिनेमातील सगळीच गाणी प्रेक्षकांना भावतात. बऱ्याच वर्षांनी अशाप्रकारचा वेगळ्या धाटणीचा आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा सिनेमा प्रदर्शित झाल्याच्या चर्चा ‘दशावतार’च्या निमित्ताने सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. अशातच चित्रपटाच्या टीमने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक भावनिक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
“आणि इथेच जिंकला मराठी चित्रपट!” असं कॅप्शन देत ‘दशावतार’च्या टीमने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये एक अमराठी सिनेप्रेमी आपल्या भावना व्यक्त करत आहे. तो म्हणतो, “मी मराठी नाहीये. पण, हा सिनेमा पाहण्यासाठी मी जुहूवरून आलो आहे. मी गोष्ट आवर्जून सांगेन दिलीप प्रभावळकर सर खरंच खूप मोठे आणि ग्रेट अभिनेते आहेत…आणि मी त्यांना आज सर्वांसमोर अगदी मनापासून सलाम करतो. मी अमराठी असून माझं मराठी सिनेमावर खूप प्रेम आहे.”
आपल्या भावना व्यक्त करताना या प्रेक्षकाला अश्रू अनावर झाले होते. थिएटरमध्ये सीटवर उभा राहून त्याने ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना सलाम ठोकला. यावेळी हा सिनेप्रेमी प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. हा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी सुद्धा यावर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.
“जे सोशल मीडियावर म्हणत आहेत फ्लॉप आहे त्यांच्या कानाखाली ही चपकार आहे”, “नॉन मराठी असलास तरी भावा तू आपलाच आहेस मराठी कलाकारांचा आदर केल्याबद्दल धन्यवाद!”, “दिलीप सरांसाठी हा सिनेमा नक्की पाहावा”, “खरंच खूप सुंदर चित्रपट आहे” अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत. याशिवाय हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई करत आहे.