मराठी कलाविश्वातील लोकप्रिय दिग्दर्शकांच्या यादीत विजू माने यांचं नाव आघाडीवर आहे. ‘पांडू’, ‘खेळ मांडला’, ‘गोजिरी’ यांसारख्या असंख्य चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. ‘स्ट्रगलर साला’ या त्यांच्या सीरिजमुळे ते सर्वाधिक चर्चेत असतात. नुकतीच या दिग्दर्शकाने मित्रम्हणे युट्यूब चॅनेलच्या मुलाखतीला हजेरी लावली होती. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील चढउतार, सध्या बदललेली परिस्थिती, स्टारडम अशा अनेक गोष्टींबाबत त्यांनी आपलं मत मांडलं.

अभिनेता कुशल बद्रिके व विजू माने यांच्यात अनेक वर्षांपासून घट्ट मैत्री आहे. यावेळी दिग्दर्शकाने कुशलबद्दलचा लक्षात राहिलेला व त्याच्या संघर्षाच्या काळातील एक प्रसंग सांगितला. दिग्दर्शक म्हणाले, “कुशलच्या आयुष्यातील त्या संपूर्ण काळाला मी हृदयद्रावक म्हणेन. तो खूप संघर्ष करून पुढे आला आहे. कुशलचा मावस भाऊ माझ्या एकांकिकेमध्ये काम करायचा. त्यामुळे आमची आधीपासून ओळख होती. एके दिवशी असंच त्याची एक एकांकिका स्पर्धा होती म्हणून मी खास पाहायला गेलो होतो. एकांकिका सुरू झाली…कुशलचा २ ते ५ मिनिटांचा पहिला प्रवेश झाला आणि तो विंगेत गेल्यावर ब्लॅकआऊट झाला.”

हेही वाचा : सद्य राजकीय स्थितीवर ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशेंनी मांडलं परखड मत; म्हणाले, “सगळ्याच नेत्यांकडून…

विजू माने पुढे सांगतात, “ब्लॅकआऊट ओपन झाल्यावर कुशल दुसऱ्या विंगेतून आला. त्याने सादरीकरण सुरू केल्यावर मला पुढच्या एक ते दीड मिनिटांत काहीतरी गडबड असल्याची जाणीव झाली. कुशल सतत खांद्यावरचा टॉवेल घेऊन तोंडाकडे धरत होता. मी खूप बारकाईने पाहिलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की, त्याच्या तोंडाच्या इथे रक्त दिसतंय. गडकरी रंगायतनला मध्ये एक खांब होता. त्याच्यावर तो धावत जात असताना आपटला आणि त्याचे दोन दात निखळून पडले.”

हेही वाचा : निसर्गरम्य जागा, वेस्टर्न लूक अन्…; स्पृहा जोशीची नवऱ्यासह गोवा ट्रिप; शेअर केला खास व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“जखम भयंकर असल्याने खूप रक्त वाहत होतं. त्यामुळे तो रुमालाने रक्त पुसायचा आणि संवाद बोलायचा…अशी पुढची ३५ मिनिटं त्याने न थांबता ती एकांकिका केली. समोर बसलेल्या प्रेक्षकांना कळलंही नाही त्याला असं काहीतरी झालंय. मला हे समजलं कारण, त्याचा पिवळ्या रंगाचा रुमाल संपूर्ण लाल भडक झाला होता…आपण घाम पिळतो तसा रक्ताने माखलेला तो रुमाल अगदी सहज कोणीही पिळू शकलं असतं. ती एकांकिका संपल्यावर मी मागे जाऊन त्याला भेटलो. त्याच्यामध्ये भयंकर पॅशन आहे आणि अभिनेता म्हणून त्याने केलेला संघर्ष हा खूप मोठा आहे.” अशी आठवण विजू माने यांनी सांगितली.